बीआरटी मार्गात आला खोदकामाचा अडथळा!

पिंपरी-चिंचवड शहरातील चारपैकी दोन बीआरटी मार्गावर खोदकाम करण्यात येत आहे. तसेच, अन्य बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी सुरू असल्याने पीएमपीएमएल बस धावण्यात अडचणी निर्माण होत असून, तिची धाव मर्यादित राहिली आहे.

बीआरटी मार्गात आला खोदकामाचा अडथळा!

दोन बीआरटी मार्गावर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम, जलवाहिनीची कामे आणखी महिनाभर चालणार

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील चारपैकी दोन बीआरटी मार्गावर (BRT) खोदकाम करण्यात येत आहे. तसेच, अन्य बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी सुरू असल्याने पीएमपीएमएल बस धावण्यात अडचणी निर्माण होत असून, तिची धाव मर्यादित राहिली आहे.  दुसरीकडे, मार्गातील अंतर्गत रस्त्याचीदेखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

सांगवी फाटा ते किवळे रावेत बीआरटी मार्गात भोंडवे वस्तीपासून ते बाजी हॉटेल चौक हा संपूर्ण मार्ग खोदण्यात आला आहे. हा रस्ता सुस्थितीत होता. तसेच, या मार्गातून बीआरटीची धाव सर्वाधिक होती. गेल्या दोन महिन्यात दोन वेळा हा मार्ग खोदण्यात आला. हा बीआरटी मार्ग बंद केल्याने बस सेवेवर परिणाम झाल्याचे पीएमपीएमएलचे अधिकारी सांगत आहेत. संपूर्ण मार्ग जेसीबीच्या साहाय्याने उखडण्यात आला असून, खड्डा खोदून त्यात जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू आहे. मार्च महिन्यात हे काम हाती घेतले. आणखीन महिनाभर हे काम सुरू राहणार असल्याची माहिती उपस्थित ठेकेदाराने दिली. दरम्यान, खोदकाम झाल्यानंतर त्वरित ते बुजविण्यात येणार असून, लवकरच हा मार्ग पूर्ववत करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने खोदाई केल्याने बीआरटी मार्गातील अडथळा कमी करण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

दुसरीकडे, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी आणि दापोडी ते निगडी या दोन्ही बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची घुसखोरी सुरू असते. त्यामुळेदेखील बीआरटी मार्गातील बसची संख्या कमी झाली आहे. केएसबी चौक व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी बीआरटी मार्गदेखील खोदला होता. मात्र, तो पूर्ववत करण्यात आला. आणखी  इतर मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले असून, कचरा टाकणे आणि अनधिकृत रिक्षा थांब्यामुळेदेखील त्यात अडचणी येत आहेत.

खोदाईचा असाही फायदा

एकीकडे बीआरटी मार्गातील खोदाईवर टीका होत असताना,  सेवा रस्त्याऐवजी या मार्गातील खोदाईमुळे इतर वाहतुकीला अडथळा ठरला नाही. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टळली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात वाहतूकदेखील इतर मार्गावर वळवावी लागली असती. त्यामुळे विनाअडथळा हे कामदेखील लवकर होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तसेच काम झाल्यावर त्याची दुरुस्तीदेखील लवकर करण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest