आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता अण्णा बनसोडे यांच्यासोबत
आरपीआय (आठवले) पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत आहे. पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून पुढील काळात त्याला यश येईल. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होईल असे आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी सांगितले.
आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांना बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती जकाते, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, जनरल सेक्रेटरी दयानंद वाघमारे, उप जनरल सेक्रेटरी बाबा सरवदे यांच्यासह आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कुणाल वाव्हळकर म्हणाले, आरपीआय पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता युती धर्माचे पालन करेल. चंद्रकांता सोनकांबळे आणि स्वप्निल कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही तर पक्षाकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देखील वाव्हळकर यांनी दिला.
बाळासाहेब भागवत म्हणाले, पुढील दोन दिवसात आरपीआयचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यात आम्ही अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा निर्धार करणार आहोत. पक्षातील जे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना समजावून सांगत एकमताने काम केले जाईल असे आश्वासन देखील भागवत यांनी दिले.