पिंपरी-चिंचवड : गडकरींच्या सूचनेनंतरही पोलीसच बुजवतात खड्डे

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न विचारला. पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

PCMC News

पिंपरी-चिंचवड : गडकरींच्या सूचनेनंतरही पोलीसच बुजवतात खड्डे

देहूरोड-चांदणी चौक कोंडीत, कंत्राटदार हटविण्याच्या बारणेंच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न विचारला. पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधत कंत्राटदाराकडून काम काढण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक उत्तर दिले. मात्र, हे सगळे संसदेत घडून देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनाच खड्डे बुजविण्याची वेळ आली आहे.

या रस्त्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटही घेतली. त्यानंतर खासदार बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न विचारला. बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग चार ते देहूरोड, रावेत, चांदणी चौकापासून पुढे कोल्हापूरपर्यंत जाणारा बायपास रस्ता बनविला आहे. रिलायन्स कंपनीने हा रस्ता बनविला होता. पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जुना प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आणला जाणार आहे का, जुन्या कंत्राटदाराकडून काम काढावे अशी मागणी बारणे यांनी केली.

त्यावर उत्तर देताना रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातून जाणारा हा बायपास रोड रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. या रस्त्याबाबत अनेक कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आहे. परंतु, मार्ग निघाला नाही. त्यामुळे सहमतीने रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असलेले काम रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन डीपीआर तयार करून नागरिकांना येणा-या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बाजूला करण्यात येईल, असे आश्वासन देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.

मात्र, एव्हढे सगळे घडूनदेखील पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागत आहेत. देहूरोड बाह्यवळण रस्त्याच्या सेवा रस्त्याचे खड्डे वाढल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी हाती कुदळ फावडे घेतले आहे.

सेवा रस्ता विकसित करा

ठेकेदाराचे काम काढण्याबाबत (टर्मिनेट) करण्याची नोटीस दिली होती. त्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे एनएचआयने साडेआठ किलोमीटरच्या एलिव्हिटेड रस्त्याची डिझाईन तयार केली. परंतु, निविदा काढता येत नाही. १२ मीटर महापालिका आणि १२ मीटर एनएचआयच्या ताब्यात सेवा रस्ता आहे. त्यामुळे २४ मीटर सेवा रस्त्याचे काम करावे, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली.

Share this story