स्मार्ट सिटीकडे महावितरणची ३० लाखांची थकबाकी

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याच्या नियंत्रणासाठी निगडीत कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर तयार केले. मात्र, या सीसीटीव्हीच्या व कंट्रोल सेंटरच्या वीजबिलाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 01:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महावितरणने सीसीटीव्हीच्या नवीन जोडणीचे काम थांबवले, वीजपुरवठा केला खंडित

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याच्या नियंत्रणासाठी निगडीत कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर तयार केले. मात्र, या सीसीटीव्हीच्या व कंट्रोल सेंटरच्या वीजबिलाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला होता. 

हे सेंटर सुरू ठेवण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने ९२ लाखांचे वीजबिल भरले, मात्र, आता सीसीटीव्हीची ३० लाख ५६ हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण नवीन जोडणी थांबवली आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीन टप्प्यांत सीसीटीव्ही बसविले आहेत. या सीसीटीव्हीच्या नियंत्रणासाठी निगडीतील अस्तिव मॉलच्या इमारतीत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी 

अंतर्गत आयसीसीसी अर्थात इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आले 

आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून तयार केलेले हे सेंटर सुरुवातीपासून चर्चेचा विषय ठरत आहे.

स्मार्ट सिटीतील सर्वाधिक रेंगाळलेला प्रकल्प आहे. त्यात सातत्याने ठेकेदार, स्मार्ट सिटी कंपनीच्या वादातून कोणत्या कोणत्या अडचणी उद्भवतात. याच प्रकारातून या सेंटरची वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली. तसेच महावितरणने सीसीटीव्हीच्या नवीन जोडणीचे कामही थांबविले आहे. 

काम करणाऱ्या ठेकेदारी कंपनीने सप्टेंबर २०२४ चे वीज बिल स्मार्ट सिटी कंपनीने भरण्यास सांगितले. परंतु, ते स्मार्ट सिटी कंपनीने महापालिका विद्युत विभागाने वीज बिल भरण्यास कळविले होते. या गोंधळामुळे तीन महिने वीजबिल थकले. अखेर महावितरणने कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने बिल अदा केले आहे.

महापालिकेने झटकली जबाबदारी

रूपीनगर येथील नागरिक सागर वाघ यांनी परिसरात सीसीटीव्ही बंद असल्याची तक्रार महापालिकेच्या स्मार्ट सारथीवर केली होती. त्यावर उत्तर देताना महापालिकेने महावितरणकडून मीटर उपलब्ध होत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार केला तर महावितरणकडे चौकशी केली असता मीटर उपलब्ध असून महापालिकेने थकबाकीची रक्कम भरल्यानंतर त्यांना मीटर देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

वीज बिल भरणार कोण?

वीज बिल कोण भरणार, याचा निर्णय होत नसताना तीन महिने या सेंटरचे वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने २५ नोव्हेंबर २०२४ ला या इमारतीचा उच्चदाब वीजपुरवठा खंडित केला होता. या सेंटरमध्ये नागरिकाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही, वायफायसह इतर सुविधा अवलंबून आहेत. तसेच, तिथे माहिती संकलित होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरू राहणे आवश्यक असल्याने तातडीने महापालिकेच्या विद्युत विभागाने एकूण ९२ लाख ४५ हजार ६२० रुपये थकीत वीज बिलाचा भरणा केला.

शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची थकबाकी ठेकेदार कंपनीने भरायची आहे. त्यांनी थकबाकी न भरल्याने त्यांना नोटीसही दिली आहे. आतापर्यंत संबंधित कंपनीकडून स्मार्ट सिटीने २ कोटी रुपयांचा दंडही वसूल केला आहे.  - किरणराज यादव, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी

महावितरणकडे नवीन मीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, महापालिकेसाठी घेण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या २२३ वीजजोडण्यांकडे सध्या ३० लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीच्या जागेवर नवीन वीजजोडणी देणे किंवा वीजजोडणीच्या नावात बदल करणे नियमानुसार शक्य नाही. थकबाकी भरल्यानंतर मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी देणे व नावात  बदल करणे ही कार्यवाही त्वरित करण्यात येईल.
- निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Share this story