संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरती वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. मेट्रोने प्रवास करणार्या प्रवाशांची रस्त्यापर्यंत पार्क केलली वाहने, रस्त्याच्या दोन्ही बाजुला सुरू असलेले रस्त्याचे काम अन् त्यात भरीसभर म्हणून रिक्षा चालकांनी 'ताबा मारल्यासारखे' अडवून ठेवलेले रस्ते! अशा परिस्थितीमुळे पिंपरीतील मोरवाडी चौकातील वाहतुक नियोजनाचा बोजवारा उडाला आहे.
अशा अत्यंत गजबजलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांना जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. सिग्नल सुटल्यावर जिवाच्या आकांताने गर्दीतून रस्ता शोधताना सामान्य नागरिक अक्षरशः घाबरगुडी उडते. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य भवन समोरच ही स्थिती आहे. या बट्ट्याबोळ झालेल्या वाहतूक व्यवस्थे संदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्ता एक विकासकामे अनेक
अर्बन स्ट्रिट डिझाईनचे दापोडी ते निगडीपर्यंतचे काम सुरू असल्याने मोरवाडी चौकातही रस्ता निमुळता झाला आहे. याच ठिकाणी मेट्रो स्थानक असल्याने प्रवास करणार्या प्रवाशांची वाहने येथे पार्क केली जातात. काही वाहने रस्त्यापर्यंत पार्क होत आहेत. तर चौकातच सुरू झालेल्या रिक्षा स्टँडमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे.
सिग्नल सुटल्यावर वाहने जोर धरतात, मात्र रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या रिक्षांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले आहे. त्यामुळे मोरवाडी चोक़ातील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कपड्याच्या दुकानाचे रस्तावर होते पार्किग
मोरवाडी चौकात अलीकडच्या रस्त्यावर मेट्रोचे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्ग रस्त्यावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे मोरवाडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी असलेल्या एका कपड्याच्या मोठ्या दालनाच्या बाहेर अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जातात. मात्र यावर कारवाई होताना दिसत नाही.