संग्रहित छायाचित्र
शहरातील ज्या मालमत्ताधारकांना करसंकलन विभागाकडून अद्याप बिल मिळाले नसेल अथवा बिल वितरित करतेवेळी बिल स्वीकारण्यास अनुपस्थिती असेल, अशा मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता क्रमांकाद्वारे आपले बिल उपलब्ध करावे. त्यानंतर थकबाकीची तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ६ लाखाहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नोंदणीकृत मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल वेळेमध्ये पोहोचवण्यासाठी करसंकलन विभागाकडून ‘प्रकल्पसिध्दी’उपक्रम राबविण्यात आला.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या महिलांना शहरामध्ये मालमत्ताकराचे बिल वाटप करण्यासाठी नेमण्यात आले. प्रकल्प सिध्दी उपक्रमाच्या माध्यमातून करसंकलन विभागाने निर्माण केलेल्या मोबाईल अँप्लिकेशनच्या माध्यमातून मालमत्ताधारकांची माहिती अपडेट करण्यात आली. त्यासोबत, मालमत्तांचे अक्षांश-रेखांश, बिल वाटप केल्याची वेळ, बिल वाटप करतानाचा फोटो आदी माहितीचे संकलन करण्यात आले.
चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्येच ऑनलाईन स्वरूपामध्ये मालमत्ताकराची बिले उपलब्ध करण्यात आली. त्याबरोबरच, करसंकलन विभाग नागरिकांना सवलतींचा लाभ मिळावा यासाठी बिलाच्या वितरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करून बिल वाटपाची प्रक्रियेमध्ये गतिशीलता निर्माण होण्यासाठी पुढाकार घेतला.
सध्या ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ताकराचा भरणा केला नाही, अशा नागरिकांना करसंकलन विभाग एसएमएस, टेलिकॉलिंग या माध्यमातून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर बिल उपलब्ध
चालू आर्थिक वर्षामध्ये ५,३२,९९९ मालमत्तांना प्रकल्प सिध्दी उपक्रमाच्या माध्यमातून बिलांचे वितरण करण्यात आले. बिल वितरित केल्यानंतर ज्या मालमत्तांच्या दारावर बिल अटकविण्यात आले व ज्या मालमत्ताधारकांकडे बिल सुपूर्द करण्यात आले अशा सर्वांचे छायाचित्रसुध्दा अँप्लिकेशनद्वारे संकलित करण्यात आले. त्यामुळे करसंकलन विभागाकडे ज्यांना बिल बजाविण्यात आले आहे. अशांची इत्थंभूत माहिती असून ज्या नागरिकांना बिल मिळाले नाही अशा नागरिकांनी आपले बिल ऑनलाईन स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावे. त्यासोबतच, संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयामध्ये किंवा सारथी हेल्प लाईन क्रमांक ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क करून आपल्या बिल वितरित करण्यात आले आहे का, याची खात्री करावी. असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे येणारे एसएमएस नागरिकांना जागरूक करण्यासाठी असून ज्या नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा केला आहे. तरी त्यांना एसएमएस येत असतील तर अशा तांत्रिक बाबींवर विभाग तातडीने दुरुस्ती करणार आहे. नागरिकांना वेळेमध्ये बिल देण्यासाठी करसंकलन विभागाने आवश्यक प्रयत्न केले असून अद्यापही बिल मिळाले नसेल अशा मालमत्ताधारकांनी सारथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा अथवा संबंधित विभागीय कार्यालयामध्ये संपर्क करावा. - अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त
महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांपर्यंत वेळेमध्ये बिलांचे वाटप व्हावे यासाठी व बिलावरील माहितीमध्ये सुधारण्यासाठी प्रकल्प सिध्दी उपक्रम राबविला. या माध्यमातून मालमत्तेच्या माहितीमध्ये दुरुस्त्या करण्यात येऊन ती अद्ययावत करण्यात आली. त्यामुळे आता मालमत्ताधारकांना मालमत्ताकराबाबत एसएमएसद्वारे माहिती पोहोचत आहे. ज्या नागरिकांना अद्याप बिल मिळाले नसेल अशा नागरिकांनी ऑनलाईन स्वरूपात बिल उपलब्ध करून अथवा करसंकलन विभागामध्ये संपर्क साधून आपले बिल उपलब्ध करून कराचा भरणा करावा.”
- प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका