पदपथांवरील अतिक्रमण थांबेना, औंध-रावेत बीआरटी रस्त्यालगत विक्रेत्यांची मनमानी
ईश्वरी जेधे, ओंकार गोरे
औंध-रावेत बीआरटी रस्त्यालगतचा फुटपाथ अनधिकृत विक्रेत्यांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथही चालणे अवघड झाले आहे. एका बाजुला पिंपरी-चिंचवड महापालिका मोटारीचा वापर टाळून पायी चालण्यासाठी प्रोत्साहन देत असताना फुटपाथवरील अतिक्रमाणांवर कारवाई केली जात नाही. विशेषत: काळेवाडी फाटा ते कावेरीनगर भुयारी मार्गावर अतिक्रमणांची संख्या जास्त आहे. महापालिकेने त्वरीत यावर कारवाई करावी आी मागणी रिदम सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.
रिदम सोसायटीचे रहिवासी अभिजित गरड म्हणाले, अतिक्रमणाच्या समस्येविरोधात आम्ही पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांपासून ते वाहतूक विभाग, नगररचना विभाग यांच्यापासून क्षेत्रीय कार्यालयांकडेही तक्रारी केल्या आहेत. गॅरेजपासून अनेक व्यावसायिकांनी फुटपाथवरच आपला व्यवसाय थाटल्याने पादचाऱ्यांना चालताच येत नाही. साेसायटीतील सर्व नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.
कावेरीनगर येथील रहिवासी स्वरूप नष्टे यांनी सांगितले की, काळेवाडी फाट्याच्या संपूर्ण पदपथावर मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाही. त्यातच अर्धा रस्ता रिक्षाचालकांनी अडविला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. बीआरटीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावरही अतिक्रमण आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्यावर चालणे धोक्याचे झाले आहे.
रिदम सोसायटीचे रहिवासी नितीन चौधरी म्हणाले, विक्रेत्यांनी फूटपाथवरील जागा व्यापल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे, रिदम सोसायटीच्या गेटजवळ वाईन शॉप आहे. त्याच्या फुटपाथवर त्यांचे ग्राहक असतात. आमच्या गेटसमोर रिकाम्या बाटल्या टाकतात. काही जण तर फुटपाथवरच बिनदिक्कतपणे मद्यमान करतात. अनेक मद्यधुंद फिरत असल्याने दिवसाही हा भाग असुरक्षित बनला आहे.
डी झोनचे प्रभाग अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले की, या भागातील रहिवाशांनी काळेवाडी फाट्याजवळील अतिक्रमणांबाबत तक्रारी केल्या आहते. मात्र, ही जागा खासगी आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून त्याप्रमाणे नोटीसा दिल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.