पीएमआरडीएच्या ४३ जणांना इलेक्शन ड्यूटी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयातील ४३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावण्यात आले आहे. संपूर्ण मावळ मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी ते काम पाहणार असून, सध्या इलेक्शन संदर्भातील पहिल्या टप्प्यातील कामकाज सुरू झाले आहे. दरम्यान, नागरिक सेवा व गृहप्रकल्प या योजना काही दिवस लांबणीवर पडणार आहेत.
मावळ लोकसभा अंतर्गत प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तर, त्या पाठोपाठ निरीक्षक म्हणूनही काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या ठिकाणी नॉमिनेशनपासून ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेपर्यंत कामकाज चालणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघांतर्गत कार्यालयातून १७ नोडल अधिकार आणि त्यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून २६ जणांची यादी करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना इलेक्शन कामामध्ये सहभागी राहावे लागणार आहे.
दरम्यान, यापूर्वीच प्राधिकरणातील चार ते पाच अधिकारी बदलून गेले आहेत. त्या जागी अद्याप नवीन अधिकारी नेमण्यात आले नाहीत. त्यात पुन्हा अस्तित्वात असलेल्या अधिकाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी नेमण्यात आली आहे. त्यामुळे आधीच रखडलेल्या प्रकल्पांना आणि गृह संकुलांना मिळणारी गती मंदावणार आहे. त्यामुळे या काळात प्राधिकरणातील नागरिकांना इलेक्शन ड्यूटी असल्याचे कारण सांगून परत पाठवण्यात येत आहे.
एका कर्मचाऱ्यांना तीन ठिकाणाहून पत्र
पीएमआरडीए हे पिंपरी-चिंचवड, पुणे या दोन्ही महापालिकेशी निगडित आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यलायअंतर्गत काही कामे चालतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून निवडणूक ड्यूटीचे पत्र प्राप्त झाली आहेत. मात्र, कोणत्या ठिकाणी ड्यूटी करायची हे कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ठरवले जाणार आहे. पुणे जिल्ह्यासह उरण, पनवेल, कर्जत या ठिकाणीही ड्यूटी लागण्याची शक्यता आहे.
इलेक्शन ड्यूटी संदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. सध्या त्या संबंधित काम सुरू आहे. आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल.
-प्रवीण ठाकरे, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.