सँडविच खाल्ल्याने 350 विद्यार्थ्यांना विषबाधा; पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील शाळेतील घटना
पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर येथील डी. वाय. पाटील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना सँडविच खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१० ऑक्टोबर) घडली. शाळेने आयोजित केलेल्या फूड सेशनमध्ये विद्यार्थ्यांना सँडविच खाण्यासाठी देण्यात आले होते. त्यातून मुलांना विषबाधा होऊन मळमळ, उलटी, भोवळ येणे असा त्रास झाला. मुलांना विषबाधा झाल्याचे समजल्यानंतर अनेक पालकांनी शाळेत धाव घेत गर्दी केली.
चिंचवडमधील शाहूनगर येथे डी. वाय. पाटील शाळा आहे. शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी फूड सेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शाळेकडून विद्यार्थ्यांना सँडविच आणि चटणी देण्यात आले. सँडविच खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चक्कर, पोटदुखी, मळमळ आणि उलटी असा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता सँडविच खाल्ल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर, शिक्षकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. शाळा प्रशासनाने ज्या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाला त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने पालकांची माफी मागितली असून सँडविच आणि चटणी यांची पूर्ण तपासणी करून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.