संग्रहित छायाचित्र
प्रशस्त रस्ते असूनही जागोजागी वाहतूक कोंडी अशी स्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये असून, यात विनापरवाना खड्डे खणणाऱ्या लोकांमुळे भर पडत आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून परवानगी न घेता खड्डे करून कोंडीत भर घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
मुकाई चौक ते किवळे गावाकडे जाणाऱ्या रोडवर खोदकाम करणारे मेसर्स लिपारू इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे फारुक खान, रा. साईनाथ नगर, निगडी यांच्यावर वाहतूक विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना अडथळा होईल अशा प्रकारे खोदकाम केले म्हणून भारतीय दंड विधान संहिता कलम २८३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Pimpri Chinchwad News)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्र तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्र आहेत. तसेच जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे देहू व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी क्षेत्र देखील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. त्यामुळे या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच एमआयडीसी आणि आयटी पार्क हिंजवडीमुळे शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शासनाकडून वाहतूक विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त पद मंजूर करून घेतले आहे. तसेच वाहतूक विभागासाठी दोन सहायक आयुक्त यांची नियुक्ती केली आहे. मात्र, स्मार्ट सिटी योजनेनुसार महापालिकेकडून रस्ते विकसित केले जात आहेत. परिणामी रस्ते अरुंद झाले असून, फुटपाथ मोठे झाले आहेत. कोंडीत भर पडण्यास हे देखील मोठे कारण आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि पाच ग्रामपंचायती तसेच तीन नगरपरिषदेचा परिसर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे शासकीय या विभागांसह खासगी संस्था, व्यायसायिक, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार यांच्याकडून वेळोवेळी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. याबाबत पोलिसांना पूर्वकल्पना दिलेली नसते. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावरून वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळत नाही. याचा थेट फटका नागरिकांना बसत असून, आता याबाबत पोलिसांनी कडक धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवून गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु परवानगी न घेता रस्ते खोदकाम केल्यास आता थेट संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे होत आहेत. या दौऱ्यासाठी देखील वाहतुकीत बदल करावा लागतो. नागरिकांना या वाहतूक बदलामुळे आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांना दररोज कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता विनापरवाना खोदकाम केल्यास गुन्हा दाखल करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सुरुवात केली आहे.
ना-हरकतपत्र दिल्यानंतर खाेदकाम करताना वाहतूक विभागाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे पालन ठेकेदार करत नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. तसेच वाहतूक शाखेकडून परवानगी घेण्यापूर्वीच खोदकाम केले जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
-विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.