संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
जगदगुरु संत तुकाराम महाराज ३३९ वा पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे या विश्वस्तांची निवड करण्यात आली. तसेच या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (२४ एप्रिल) सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने या सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे अध्यक्षतेखाली देहू येथे देऊळवाड्यात बुधवारी (२४ एप्रिल) बैठक झाली. त्यात सर्वानुमते वरील निवड करण्यात आली. यावेळी विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे हे उपस्थित होते. माणिक महाराज मोरे म्हणाले, यंदा पालखी सोहळ्याचे २८ जूनला प्रस्थान आहे. या सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थान जय्यत तयारी करणार आहे. देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारीतील वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी एक महिना अगोदर पालखी मार्गावर पाहणी करणार आहे. यंदाचा पालखी सोहळा कडक उन्हाळा व निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होत असला तरी भाविकांना व वारकऱ्यांना याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे यंदा पालखी सोहळा नेहमीप्रमाणेच उत्साहात होणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे हे या विश्वस्त मंडळाचे शेवटचे वर्ष असल्याने यंदाचा पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल केशव मोरे, माणिक महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे.
लोणी काळभोर ते यवत हे सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथे सर्व दिंड्या बारस सोडून निघत असतात. पालखी उरुळी कांचन येथे दुपारच्या विश्रांतीच्या वेळी दिड तास गावात पालखी जाण्यात व येण्यासाठी दिड तास लागतो. त्यामुळे येथून पालखी निघण्यास उशीर लागत असल्याने यवत येथील मुक्कामी पोहचण्यासाठी उशीर लागतो. उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा, अशी विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.