मोकाट फिरतात धोकादायक श्वान !, शहरात मोकाट श्वानांची धास्ती
शहरात श्वानप्रेमी (dog lover) नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यात जगातील सगळ्यात जास्त धोकादायक असणारे श्वानदेखील पाळले जात आहेत. मात्र, शहरातील अनेक वर्दळीच्या भागात धोकादायक असणारे श्वानांना त्यांचे मालक हे विनासाखळी सोडून देत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर, महिला, लहान मुलांवर कधीही श्वानांचा हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. श्वानमालक हे नागरिकांच्या जिवाशी खेळू लागल्याचे दिसून येत आहे. (Pimpri Chinchwad)
पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव श्वानांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात विविध जातीच्या सुमारे ८१० श्वानांचा परवाना घेण्यात आला आहे. मात्र, सगळ्यात जास्त धोकादायक असणाऱ्या पाळीव श्वानांची संख्या पशुवैद्यकीय विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अनेक लहान मुले, महिलांसह नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत. भटके असो की पाळीव कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्वात भयानक समजल्या जाणाऱ्या पाळीव श्वानांच्या हल्ल्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, चिंचवड यासह अनेक भागात धोकादायक असणारे श्वान हे त्यांचे मालक फूटपाथ, रस्त्यावरून फिरवत असतात. जगताप डेअरी रस्ता, काळेवाडी बीआरटी रोड यासह अनेक वर्दळीच्या भागात त्या श्वानांना फिरवले जात आहे. फूटपाथ, रस्त्यावरून फिरवताना त्या श्वानांची गळ्यातील पट्टा, साखळी सोडून मोकळे सोडले जात आहे. त्याच फूटपाथवर, रस्त्यावर हे श्वान शौच करून अस्वच्छता करत आहेत.
सर्वात धोकादायक असणाऱ्या पिट बुल, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, डॉबरमन या सारखे श्वान हे त्यांचे मालक फिरवत असताना त्यांचे गळ्यातील पट्टे काढत, साखळी सोडून फिरवल्याने नागरिकांसह लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून फिरणे मुश्किल झाले आहे. हे श्वान धोकादायक असूनही, त्यांचे मालक त्यांना बिनासाखळी सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळू लागले आहेत. मात्र, साखळी सोडल्यानंतर ही श्वानमालक हे 'घाबरू नका. आमचा कुत्रा चावत नाही' असे सांगू लागले आहेत. दरम्यान, श्वान हा माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. ते त्यांच्या मालकाशी खूप प्रामाणिक असतात.
कुत्रे खूप प्रामाणिक व हुशार असतात. परंतु, जगात कुत्र्यांच्या काही प्रजाती अशाही आहेत ज्या अत्यंत भयानक आणि धोकादायक आहेत. धोक्याची सूचना मिळताच ते समोरच्यावर हल्ला करतात. त्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य असते. त्यामुळे त्या श्वानामुळे रस्त्यावर फिरताना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. धोकादायक श्वानांना रस्त्यावर, फूटपाथवर, वर्दळीच्या ठिकाणी मोकाट सोडल्याने नागरिकांवर हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पिट बुल, रॉटविलर, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड या जातीचे कुत्रे आक्रमक आणि अतिशयक धोकादायक असतात. या जातीच्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांसह मालकांना चावा घेत हल्ला केल्याच्या देखील घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, या जातीचे श्वान पाळणाऱ्या मालकांनी त्या कुत्र्यांना रस्त्यांवरून फिरवताना इतरांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या गळ्यातील पट्टा, साखळी काढून त्यांना मोकाट सोडता कामा नये. जेणेकरून फूटपाथ, रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांवर हे श्वान कधीही हल्ला करू शकतात. त्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी त्या कुत्र्यांच्या मालकांनी घेतली पाहिजे. यापुढे नागरिकांच्या तक्रारी आल्यास निश्चित संबंधित मालकांवर कारवाई
केली जाईल.
- संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग,पिंपरी-चिंचवड महापालिका
पिट बुल सर्वात धोकादायक कुत्रा आहे. हे कुत्रे आक्रमक आणि अतिशय धोकादायक आहे. तर रॉटविलर जातीचे कुत्रे सर्वात शक्तिशाली असते. तो आक्रमक झाल्यावर कोणाचाही चावा घेण्यासाठी मागेपुढे पाहात नाही. तसेच डॉबरमॅन कुत्र्याचा चेहरा इतका आक्रमक असतो. त्यांच्याकडे पाहून धडकी भरते. त्यामुळे अशाप्रकारे पाळीव श्वान हे रस्त्यावर मोकाट सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि सारथीवर तक्रार केली होती. पण, कोणतीही कारवाई झालेली नाही.
- संदीप बिस्वास, तक्रारदार नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.