संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराला दररोज पाणीपुरवठा (Water supply) मिळण्यासाठी अजून दीड वर्ष म्हणजेच २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला गती देण्यात आली आहे. जलवाहिनी, अशुद्धउपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाच वेळी पूर्ण करण्यावर भर आहे.
२०२५ पर्यंत कामे पूर्ण होतील, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. तसेच वाढीव पाणी मिळेपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे सांगत २०१९ पासून सुरू असलेला एक दिवसाआड पाणी पुरवठा २०२५ पर्यंत तसाच राहणार आहे. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी दीड वर्ष वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.
महत्त्वाचे म्हणजे सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरली आहेत. मात्र, पुढील वर्षीच्या पावसाचे गणित बिघडण्याची शक्यता असल्याने पाणी आतापासूनच जपून वापरावे लागणार आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नव्याने पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची देखील शक्यता आहे.
शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधा-यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून होत आहे. त्यामुळे जागेचे भूसंपादन करण्यास अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढून कामाला गती दिली आहे. महापालिका हद्दीतील आठ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.
दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे उंचावरील भागाला पुरेसे पाणी मिळत आहे. तक्रारींमध्ये घट झाली आहे. तसेच वाढीव पाणी मिळेपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे सांगत २०२५ नंतरच दररोज पाणीपुरवठा होईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.
शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून १३ असे ५९३ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही शहराच्या विविध भागातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठविली आहे. जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा करायचा की पूर्वीप्रमाणेच काम सुरू करायचे याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.