सिलेंडर स्फोटाच्या झळा; दोन अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित
ताथवडे येथे झालेल्या गॅस चोरी आणि स्फोटप्रकरणात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी -चिंचवडचे सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सोमवारी रात्री याबाबतचे आदेश दिले. दोन अधिकाऱ्यांमध्ये वाकड आणि रावेत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
रविवारी रात्री राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेच्या ब्लॉसम स्कूल शेजारील मोकळ्या जागेत प्रोपिलिन गॅस भरलेल्या टँकरमधून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस चोरी करून भरला जात होता. रविवारी हा प्रकार घडत असताना रात्री अकराच्या सुमारास स्फोट होऊन आग भडकली. एकामागोमाग ९ स्फोटाचे आवाज होत आगीचे डोंब उडाल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली.
नऊ सिलेंडर फुटल्याने जेएसपीएम अंतर्गत असलेल्या ब्लॉस शाळेतील चार स्कूलबसने पेट घेतला. या घटनेमुळे येथील अक्षर एलिमेंटा या सोसायटीच्या भिती हादरल्या. तसेच शाळेच्या इमारतीच्या काचा फुटल्या. अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत येथे कुलिंग करण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणी ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी (दि. 8) जेएसपीएम कॉलेज परिसर ताथवडे येथे घडली. आता स्फोटप्रकरणात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.