गुन्हेशाखेची कार्यालये आता तळेगावात, परिसरात झालेल्या अनेक खुनांमुळे पोलीस आयुक्तांचा निर्णय
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
संघटित गुन्हेगारीविरोधी पथक (गुंडा स्कॉड) आणि गुन्हे शाखेचे युनिट पाचच्या पथकाचे कार्यालय आता तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. राजकीय व्यक्तींच्या एकापाठोपाठ तळेगाव दाभाडे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट आणि परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांना दररोज तळेगाव दाभाडे परिसराला भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा १२ मे रोजी नगर परिषदेच्या आवारात भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने घाव घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचीही (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
आवारे यांच्या हत्येपूर्वी शिरगांवचे सरपंच गोपाळे यांची हत्या झाली होती. तसेच या दोन्ही घटनांच्या काही दिवस आधी तळेगाव दाभाडे येथील एका बड्या गृहसंकुलात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या तिन्ही घटनांमध्ये आरोपींनी पिस्तुलांचा वापर केला होता. या घटनांमधील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी तसेच तळेगाव-चाकण रस्ता परिसरातील गुन्हेगारीचे स्वरूप पाहता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘गुन्हे शाखेची दोन पथकेच आता तळेगाव दाभाडेत जाऊन तेथून कारभार चालवतील,’ असे आदेश दिले आहेत.
संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (गुंडा स्कॉड) हे संपूर्ण शहरासाठी काम करते. तर गुन्हे शाखेचे युनिट पाच हे देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगांव या भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी गुंडा स्कॉडचे पथक आकुर्डी येथून कारभार चालवित होते, तर युनिट पाचचे पथक हे देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरातील कार्यालयातून कामकाज करीत होते.
किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावासह अन्य एका कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, हा गुन्हा राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आल्याचे आमदार शेळके यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आवारे आणि शेळके समर्थकांनी परस्परविरोधी निदर्शने केली होती. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मावळ परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची सीमा ही तळेगाव दाभाडे असल्याने अनेक गुन्हेगार आणि विविध गुन्ह्यांमधील आरोपींनी लपण्यासाठी मावळ पट्ट्यात स्थान मिळविल्याचे यापूर्वीच्या घटनांमधून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ, चाकण परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन केल्यानंतर आता शहराला दोन पोलीस उपायुक्त, एक सहायक आयुक्त मिळावा म्हणून अतिवरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. तेव्हा त्यांनी पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याबरोबरच सहायक आयुक्त-उपायुक्त दर्जाचे अधिकारी शहराला दिले जातील असे संकेत दिले होते. तसेच यातील एक उपायुक्त हे खास मावळ म्हणेज तळेगाव दाभाडे आणि आसपासच्या परिसरासाठी नियुक्त केले जाणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.