'राज्य उत्पादन'ची लपवाछपवी! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कानउघडणी

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटल्यानंतर खडबडून जागा झालेल्या अधिकाऱ्यांकडून सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा देखावा सुरू

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटल्यानंतर खडबडून जागा झालेल्या अधिकाऱ्यांकडून सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई कुठे केली आणि कधी केली हे सांगण्यास टाळाटाळ होत असून, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांकडून लपवाछपवी कायम आहे.

पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) सुमारे १३ ठिकाणी मंगळवारी (२१ मे) रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी निरीक्षक सुनील पराळे यांच्यासह मोठा फौजफाटा आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, पराळे यांनी कुठे कारवाई केली हे सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला; आम्ही किती कारवाई केली. कुठे केली, कधी केली, का केली याची माहिती आपणास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच मिळेल, असे सांगत पराळे यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

अल्पवयीन मुलाने पबमध्ये पार्टी केल्यानंतर आलिशान कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना ठोकरले. या बेदरकार अपघाताचे आणि एकंदरीतच घटनेचे पडसाद सध्या देशभर उमटत आहे राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांना या प्रकरणासाठी पुण्यात ठाण मांडून बसावे लागले. फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलीस आणि राज्य उत्पादन शुक्रवार करून झालेल्या कारवाई बाबतचा आढावा घेऊन कारवाई अधिक कडक करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी रात्री बारापासून पहाटे दोन वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम राबवत काही ठिकाणी खटले दाखल केले. बारमध्ये वाईन शॉपमधून खरेदी केलेली दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्याने तसेच ज्या जागेत मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या हॉटेलचा परिसर म्हणजेच रुफ टॉप हॉटेल तसेच तळमजल्यावरील हॉटेलवर ही कारवाई झाली.

दररोज सुरू असलेल्या या सर्व प्रकाराबाबत खुद्द गृहमंत्र्यांनीच विचारणा केल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. मात्र हा केवळ कारवाईचा दिखावा असल्याने अधिकाऱ्यांना किती कारवाई झाली हे सांगता येत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव, देहूरोड, बावधन यासह पिंपळे सौदागर आदी भागात दारू विक्रीची हॉटेल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. शासनाला महसूल मिळावा यासाठी दारू विक्रीचा मागेल त्याला परवाना दिला गेला आहे. परवाना देताना ठरवून दिलेल्या नियम अटी शर्तींचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.

महामार्गावरील ढाबे त्याचबरोबर शहरातील अनेक हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना नसताना देखील मद्य विक्री सर्रासपणे केली जात आहे. मात्र याकडे पिंपरी चिंचवड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हेतू पुरर्सर दुर्लक्ष होताना दिसते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest