संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
गुजरातच्या एका खासगी सल्लागाराने चुकीचे कागदपत्रे, चुकीची कामे करून महापालिकेला फसवल्याची, तसेच चिंचवडच्या राजर्षी शाहू उद्यानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती. पुरावे दिल्यानंतर देखील महापालिकेकडून चौकशीस टाळाटाळ सुरू होती. अखेर दक्षता व नियंत्रण विभागाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले असून तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad News)
गुजरातमधील एका सल्लागाराने महापालिकेच्या उद्यान विभाग, स्थापत्य विभागासह विविध विभागात करोडोंचा सल्ला दिला. मात्र, सल्लागार म्हणून पालिकेच्या पॅनेलवर नियुक्ती होण्यासाठी त्यांनी बोगस कागदपत्रे पालिकेला जमा केली. त्याआधारे सुमारे १०० ते १२५ कोटी रूपयांची कामे केली आहेत. बोगस कागदपत्रे देऊन महापालिकेची एक प्रकारे फसवणूक केली. त्यानी केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचे आरोप भापकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले होते.
यासह शाहुनगरमधील राजश्री शाहू उद्यानाच्या (Rajarshi Shahu Udyan ) पुनर्विकासाच्या एकुण १ कोटी ६६ कोटी रक्कमेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडे सादर करून चौकशीची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतरही प्रशासनाकडून चौकशी करण्याबाबत टाळाटाळ सुरू होती. भापकर यांनी पत्रव्यवहार करून प्रशासन संबधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे अखेर प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली. संबधित सल्लागारांची व शाहू उद्यानातील कामांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण ?
शाहूनगर मधील राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम झाले आहे. ए.आर. हार्दिक, के पांचाळ याने खोटी कागदपत्रे सादर केली असताना आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात होती. पांचाळ यांनी धूर्तपणे उद्यानाच्या पुनर्विकासाच्या निविदेत विशेष अटी समाविष्ट करून निविदा तयार केल्या होत्या. या निविदेत त्याच्या भावाच्या कंपनीने अट पूर्ण केली नसतानाही निविदा मूल्यापेक्षा ४ टक्के कमी दराने मंजुर केली. निविदेमध्ये पुनर्विकासाच्या कामाचा एक भाग म्हणून समाविष्ट केलेल्या २१ बाबींचा समावेश होता. पण, अनेकांचा काम करताना वापर केला नाही. कमी दर्जाचे साहित्य वापरले. शाहूनगर मधील राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाच्या १ कोटी ६६ लाखांच्या निविदेमध्ये ए.आर. हार्दिक के पांचाळ यांनी फेरफार करून महापालिकेची १ कोटी २० लाखांची फसवणूक केली आहे. यामध्ये सल्लागार, ठेकेदार, अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने करदात्या नागरिकांच्या पैशाची लुट केली आहे. त्यामुळे आपण स्वतः हा लक्ष घालून तातडीने शाहुनगर येथील उद्यानात दौरा करून या प्रकरणाची चौकशी करावी. विभागातील पाच नागरिक व तक्रारदार म्हणून आम्ही व मनपाच्या वतीने व्हीडीओ रेकॉर्डिंग करावी. त्यानंतर तातडीने सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करावी. गैरव्यहार केलेल्या सर्व स्थापत्य,उद्यान, विद्युत,लेखापरीक्षक व निविदा प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या झालेल्या अपहरणाच्या रक्कमा संबंधितांकडून कायद्याप्रमाणे चारपट वसूल कराव्यात, अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती.
स्थापत्य विभागाअंतर्गंत नियुक्त आर्किटेक्टसंबधी व राजर्षी शाहू उद्यानातील कामांबाबत प्राप्त तक्रारीनुसार तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. तपासणीनंतर हा अहवाल पालिका आयुक्त यांना दक्षता विभागाकडून सादर करण्यात येईल. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.