पिंपरी-चिंचवड : आयुक्तांनी नामफलकावर केला आईच्या नावाचा समावेश

शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे, सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे या दोन्ही शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे.

PCMC News

पिंपरी-चिंचवड : आयुक्तांनी नामफलकावर केला आईच्या नावाचा समावेश

महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण होण्यासाठी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू, प्रशासकीय दस्तऐवजांवर आता मराठी स्वाक्षरी

शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे, सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे या दोन्ही शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांच्या नामफलकासह इतर अधिकाऱ्यांच्या नामफलकामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यात आला. आयुक्त दालनाबाहेर आयुक्तांचा नामफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय दस्तऐवजांवर मराठी भाषेत स्वाक्षरी करण्यासही सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला कामकाज, व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत तसेच उमेदवाराच्या नावापुढे आईच्या नावाचा समावेश करण्याबाबत सरकारच्या मराठी भाषा विभागाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे. या निर्णयांची अंमलबजावणी करत आयुक्त शेखर सिंह यांच्या आयुक्त दालनाबाहेरील नामफलकामध्ये बदल करून ‘’शेखर अनिता चंद्रहास सिंह’’ असा नामफलक लावण्यात आला आहे. तसेच इतर अधिकाऱ्यांच्याही नावापुढे आईच्या नावाचा समावेश करून त्यांच्या दालनाबाहेरील नामफलक बदलण्यात येत आहेत.

महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी, समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिलांची संतती (अनौरस संतती) यांनाही समाजामध्ये ताठ मानाने जगता यावे यासाठी शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविणे बंधनकारक करण्याबाबतच्या धोरणात्मक निर्णयास राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत.

तसेच महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व प्रशासकीय कामकाजात तसेच  व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबत सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व कामकाज मराठी भाषेत होईल याची दक्षता घ्यावी,असे परिपत्रक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत सर्व विभागांना पाठवले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या दोनही निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest