शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक, फ्रीजच्या कॉम्प्रेसरचाही झाला स्फोट
पुनर्वसन प्रकल्पातील एका घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. गुरुवारी (७ सप्टेंबर) दुपारी चिंचवडगाव येथील वेताळनगरमध्ये ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अशोक तेलंग यांचे कुटुंब वेताळनगर येथे पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींग नंबर ५ मध्ये पहिल्या मजल्यावर राहते. जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. दिवसभर शहरात फिरून ते कपडे जमा करून भांडी विकत असतात. गुरुवारी सकाळी तेलंग आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या कामासाठी सकाळी बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या घरात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले आणि घरात आग लागली. घरात मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने त्यावर ही आग पसरली आणि मोठ्या प्रमाणात आगीचे लोट घरातून बाहेर येऊ लागले. याचवेळी घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.
याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळाली असता पिंपरी मुख्य केंद्र येथील दोन, थेरगाव, रहाटणी आणि प्राधिकरण येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, कपड्याची आग काही वेळ सुरु राहिली. त्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. हा धूर इमारतीमधील सर्व घरांमध्ये गेल्याने नागरिकांची धावपळ झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील अन्य नागरिकांना घरातून सुखरूप खाली आणले. तेलंग यांचे संपूर्ण घर या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.