संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवडमध्ये बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरीगाव येथील वाघेरे कॉलनीतील गीता निवासमध्ये राहणाऱ्या वर तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर पिंपरी पोलीस ठाण्यात तब्बल १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ०२ जानेवारी २०२३ ते १७ मे २०२३ च्या दरम्यान घडला आहे.
रोहित सुरज भोसले (वय २२, रा. गीता निवास, सौंदर्य चौक, वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वर तरुणाचे नाव आहे. तर वर तरुणाचा मावस भाऊ रोहन राजेंद्र कांबळे (वय २२), मामे आजोबा लालासो कांबळे (वय ७०), मुलाचा मित्र तुषार गायकवाड (वय २२, रा. खडकी, पुणे), वर मुलाचा भाऊ प्रेम ऊर्फ राहुल सुरज भोसले (वय १७), मावशीचा नवरा शिवाजी साळवे (वय ४५) तसेच मुलाच्या मावशीची तीन मुले आणि ६ महिला अशा एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर मुलाला मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती होते. मात्र, तरी देखील मुलाने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. त्यानंतर पीडित मुलीसोबत जबरदस्ती अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मुलीने नकार दिल्यास तिला मारहाण करण्यात आली. तसेच घरच्या मंडळींकडून सातत्याने छळ केला जात होता. अखेर या प्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, वर मुलाला अटक करून १६ जणांवर कलम ३७६ (३), ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४, लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ८, १७, तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.