संग्रहित छायाचित्र
भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणारे आई आणि मुलगा खाली पडले. दरम्यान मुलगा कारच्या खाली आला. त्यानंतर कार चालकाने मुलाला तब्बल पाऊण किलोमीटर अंतर फरफटत नेले. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली फाटा येथे गुरुवारी (दि. १०) रात्री घडली.
पार्थ प्रणव भोसले (वय ७, रा. नारंग सोसायटी, काळजेवाडी, चऱ्होली) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सोनल प्रणव भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पार्थ आपली आई सोनल यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच 12/इडी 5337) घरी येत होता.
साडेआठ वाजताच्या सुमारास ते चऱ्होली फाटा येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच 14/एफएम 4690) सोनल यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात पार्थ आणि त्याची आई खाली पडले. पार्थ हा कारच्या खाली अडकला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी कार चालकाला आरडाओरडा करीत थांबण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने त्याकडे दुर्लक्ष करीत जवळपास पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पार्थ याला फरफटत नेले.
या अपघातात पार्थ याची आई गंभीर जखमी झाली असून तिला १३ टाके पडले. तर पार्थ यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.