मतमोजणी दरम्यान बालेवाडी परिसरात वाहतुकीत होणार बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

मावळ लोकसभा मतदार संघातील मतमोजणी येत्या मंगळवारी (दि. 4) होणार आहे. यानिमित्ताने सुरक्षा कारणामुळे आणि वाहतूक कोंडी होऊ नये यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.

संग्रहित छायाचित्र

मावळ मतमोजणी दरम्यान वाहतूक शाखेचे आदेश

पंकज खोले

मावळ लोकसभा मतदार संघातील मतमोजणी येत्या मंगळवारी (दि. 4) होणार आहे. यानिमित्ताने सुरक्षा  कारणामुळे आणि वाहतूक कोंडी होऊ नये यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.  वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी  दिली. मंगळवारी (दि. 4) पहाटे पाचपासून रात्री साडे अकरा पर्यंत आवश्यकतेनुसार गर्दी संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत हा बदल राहणार आहे.

मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या दरम्यान कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 

त्यासाठी बालेवाडी स्टेडीयम मुख्य प्रवेशव्दारा समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी पहाटे 5 ते रात्री साडे अकरा या वेळेत जड व अवजड वाहनांना म्हाळुंगे गाव ते राधा चौक आणि राधा चोक ते म्हाळुंगे गाव या मार्गावर प्रवेश बंद राहील. त्याबाबत वाहन चालकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा.

पर्यायी मार्ग :

1) चांदे- नांदे व म्हाळुंगे गावातून येणारी वाहने ही उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील.

2) राधा चौकातून येणारी वाहने ही म्हाळुंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे- नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील. 

3) चांदे नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी येथे येऊन इच्छित स्थळी जातील, व बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग व्यवस्था 

म्हाळुंगे पोलिस चौकी ते उत्तम स्विट (पुणेरी स्वीट) चौक या मधला रस्ता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी राधा चौकातून पुढे डाव्या बाजुला खंडोबा मंदिराच्या पाठिमागील मोकळ्या जागेमध्ये पार्कींगकरीता व्यवस्था केली आहे. ऑर्किड हॉटेल महामार्ग प्रवेशव्दारापासून सुरू होणारा सेवारस्ता हा मुळा नदी ब्रिज पर्यंत रहदारीसाठी बंद ठेवला असून हा रस्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंगची व्यवस्था त्या सेवारस्त्यावर केली आहे. इतर पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest