ताथवडे गॅस स्फोट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; तिघेजण ताब्यात
ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी (दि. ८) जेएसपीएम कॉलेज परिसर ताथवडे येथे घडली.
महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअर नाव असलेला गॅस टँकर (जीजे १६/एडब्ल्यू ९०४५) चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून प्रोपिलिन गॅसची बेकायदेशीरपणे चोरी केली. किती कायदेशीरपणे गॅस सिलेंडर मध्ये भरताना मोठ्या प्रमाणात आग लागून स्फोट होण्याची जाणीव असताना आरोपींनी ही कृती केली.
दरम्यान गॅस चोरी करत असताना आग लागली. मोठा स्फोट झाला. यामध्ये स्कूल बस तसेच इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. जागा मालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे आपली जागा उपलब्ध करून दिली. याबाबत भारतीय दंड विधान कलम ३७९, ४०७, २८५, ३३६, ४२७, ३४, जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७, स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर टँकर चालक पळून गेला आहे. पोलिसांनी अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.