संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने रुजू १२ कर्मचाऱ्यांनी अवध्या महिनाभरात महापालिकेच्या हक्काच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. इतर ठिकाणी चांगला पर्याय उपलब्ध झाल्याने या कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत असले तरी महापालिकेची नोकरी सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने विविध ११ पदांच्या ३६२ जागांसाठी नोकर भरती राबविली होती. त्यापैकी आतापर्यंत एकूण २५६ कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन विविध विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांनी अवघ्या एक ते दोन महिन्यातच आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. नव्यानेच लागलेली महापालिकेची कायमस्वरूपी हक्काची नोकरी सोडत असल्याने अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिपरी-चिंचवड महापालिका राज्यात 'श्रीमंत महापालिका' म्हणून ओळखली जाते. शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विविध नावीन्यपूर्ण व नवनवीन संकल्पना महापालिकेकडून राबविल्या जात आहेत, मोठेमोठे खर्चिक प्रकल्प महापालिकेकडून राबविले जातात. त्यामुळे राज्यभरातील अधिकारी महापालिकेने संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील असतात.
नियुक्ती मिळावी म्हणून थेट मॅटपर्यंत काही प्रकरणे पोहोचली आहेत. असे चित्र असताना नव्याने रुजू झालेले कर्मचाऱ्यांचे महापालिकेत मन रमत नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तब्बल १२ जणांनी आपल्या पदाचा आयुक्तांकडे राजीनामा दिला आहे. तो आयुक्तांनी मंजूर करीत त्यांना कार्यमुक्त केले आहे. त्या रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे ६ जून २०२४ नंतर केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात विविध विभागांच्या एकाच वेळी परीक्षा झाल्याने उमेदवारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. उमेदवारांनी वेगवेगळ्या विभागांतील पदासाठी परीक्षा दिल्या आहेत. निकाल लागल्यानंतर ते महापालिकेत रुजू झाले. त्यानंतर इतर विभागांचा निकाल लागला. त्यातही निवड झाल्याने आणि अधिक वेतन, इतर सुविधा असल्याने रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. आतापर्यंत आयुक्तांनी नव्या १२ कर्मचाऱ्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. -
विठ्ठल जोशी, उपयुक्त, सामान्य प्रशासन, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.