BRT News: बीआरटीला अडथळ्यांची शर्यत

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बीआरटी मार्ग फेल गेले असल्याचे दिसून येते. स्थानकांची दुरवस्था, अस्वच्छता, बसच्या वेळेची अनियमितता अन् बीआरटी मार्गाचा सार्वजनिक वापर

BRT

संग्रहित छायाचित्र

शहरातील चारपैकी एक मार्ग फसला, विविध समस्यांनी बीआरटी मार्ग अडचणीत

पंकज खोले- 
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बीआरटी मार्ग फेल गेले असल्याचे दिसून येते. स्थानकांची दुरवस्था, अस्वच्छता, बसच्या वेळेची अनियमितता अन् बीआरटी मार्गाचा सार्वजनिक वापर या सर्वांमुळे बीआरटी मार्गातून पीएमपीला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शहरात धावणाऱ्या चारपैकी काळेवाडी फाटा ते देहू आळंदी हा मार्ग फसला असल्याचे दिसून येते.

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या वतीने ४ मार्गांवर बीआरटी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. सांगवी फाटा ते मुकाई चौक-किवळे, नाशिक फाटा ते वाकड , दापोडी ते निगडी (जुना पुणे-मुंबई मार्ग) आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या मार्गावर बीआरटी धावत आहेत. या दरम्यान जवळपास ९३ स्थानके असून, त्या माध्यमातून प्रवासी या बीआरटी मार्गाचा वापर करत आहेत. मात्र, बीआरटी स्थानकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. तर, अनेक मार्गावर बसचे प्रमाण कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.

फेऱ्या वाढवण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरवणारी पीएमपी दिवसेंदिवस अपुरी पडत आहे. अद्यापही शहरातील उपनगरात, समाविष्ट गावात आणि लगतच्या ग्रामीण भागात बस सेवा पुरेशी नाही. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो.

बीआरटी मार्गावर खासगी कंपन्यांचे थांबे

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मार्ग हे शहरातील खासगी कंपन्या व शाळेतील विद्यार्थ्यांचे थांबे झाले आहेत. अनेक प्रवासी बस, कंपन्यांची वाहने आणि रिक्षाही बीआरटी मार्गावर थांबलेल्या दिसून येतात. इथूनच त्या वाहनात प्रवासी उतरताना अथवा चढताना दिसून येतात.

३ आगारातून २५ लाखांचा महसूल

पिंपरी-चिंचवड शहरातील ३ आगारातून पुणे व पीएमआरडीएच्या हद्दीत धावणाऱ्या बसला दिवसाकाठी जवळपास २५ लाखांचा महसूल मिळतो. तसेच, विनातिकीट कारवाई या परिसरातून अधिक होत असल्याचे पीएमपीच्या वतीने सांगण्यात आले

मार्गावर ठिकठिकाणी कचरा

सांगवी फाटा ते किवळे या बीआरटी मार्गावर काळेवाडी फाटा, गुजरनगर, डांगे चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. तसेच,  ताथवडे परिसरातील स्थानिक नागरिक आपला कचरा बीआरटी मार्गालगतच फेकतात. काळेवाडी आणि डांगे चौक येथील आठवडा बाजार संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा या मार्गातच फेकला जातो.

बीआरटी मार्ग बनली पार्किंग

बीआरटी मार्गलगतच विविध ठिकाणी वाहने पार्क केल्याचे आढळून येतात. काळेवाडी फाटा येथील बीआरटी मार्गावर सर्रासपणे वाहने पार्क केली जातात. विशेष म्हणजे महापालिकेचा एक ट्रक तेथे पार्क केला असल्याने इतरही वाहने त्या पाठोपाठ पार्क केली जातात.

बूम बॅरियर, सीसीटीव्ही बंद

पीएमपी बस व्यतिरिक्त अन्य वाहने बीआरटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना प्रवेश थांबवण्यासाठी पीएमपीएलने बूम बॅरियर बसवले होते.  पायलट प्रोजेक्टअंतर्गत शहरात १२ ठिकाणी बूम बॅरियर सुरू केले. त्यात जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, तसेच काळेवाडी ते स्पाइन रोडवरच्या बीआरटी मार्गावर आठ ठिकाणी बॅरियर बसवण्यात आले. मात्र ते बॅरियर बंद पडले असून , सीसीटीव्ही यंत्रणाही तुटली आहे.

खासगी वाहनांचा सर्रास प्रवेश

शहरातील बीआरटी मार्गात सर्रासपणे खासगी वाहने शिरतात. मध्यंतरी वाहतूक व पीएमपीएल प्रशासनाने अशा वाहनांवर कारवाई केली होती. मात्र, कालांतराने कारवाईत चालढकलपणा करण्यात येत असल्याने वाहनचालकांचे बीआरटीमध्ये शिरण्याचे वाढले आहे.

काळेवाडी बीआरटी ठरली शोभेची

काळेवाडी फाटा ते ऑटो क्लस्टर या दरम्यान सर्व स्थानके रिकामी असतात. या मार्गावर बसची वारंवारता अतिशय कमी असल्याने स्थानके विद्यार्थी मार्ग केवळ शोभेचा बनला आहे. प्रवासी बसची वाट पाहून पुन्हा रिक्षाची अथवा खासगी वाहनाची वाट पकडतो.

बस स्थानकावर जाहिराती

शहरातील बीआरटी तसेच, इतर बस थांब्यांवर फुकट जाहिरातबाजी करण्यात येते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित आगार प्रमुखाचे असते. सध्या सर्वत्र बस थांब्यांवर जाहिराती दिसून येतात, त्यामुळे थांब्यांचे विद्रुपीकरण होत आहे .

शहराची सद्यस्थिती

पिंपरी-चिंचवड शहरात धावणारी बस - ३९७

बीआरटी मार्गाची स्थिती - १६४

पिंपरी-चिंचवड मेट्रो फिडर सेवा - ४

एकूण बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बस - ९५०

विना बीआरटी सेवा - १४९

 

पीएमपीला नव्याने ४०० बसेस मिळणार असून, त्याचा जास्तीत जास्त वापर प्रवाशांना व्हावा यासाठी प्रयत्न राहणार आहे.

-सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest