संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला आठ दिवस उलटले असून अद्याप शहरातील किती पालकांनी आरटीईसाठी अर्ज केले, याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळावर प्राप्त अर्जांची संख्या दिसत नसल्याने किती जणांनी अर्ज केले हे समजत नसल्याचे शिक्षण विभागाच्या कर्मचा-यांनी सांगितले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेला गेल्या मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदा शहरामध्ये ३२२ शाळांची नोंदणी झाली आहे. या ३२२ शाळांमध्ये ८ हजार ५० जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. पालकांना अर्ज भरण्यासाठी मदत करण्याकरिता सहायक शिक्षकांची केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी पालक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्रावर जात आहेत; मात्र आतापर्यंत किती पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले याची माहिती शिक्षण विभागालाच नसल्याचे समोर आले आहे.
संकेतस्थळावर किती जणांनी अर्ज केले याची एकत्रित आकडेवारी येत आहे. तालुक्यानुसार आकडेवारी येत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते समजत नाही. परिणामी, राज्य सरकारने आरटीईच्या नियमात बदल केल्यानंतर पालकांचा प्रतिसाद कसा आहे याबाबत स्पष्टता येत नाही. यामुळे आरटीईची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आरटीईच्या नियमात बदल, खासगी इंग्रजी शाळा गायब
आरटीईच्या नियमात बदल केल्याने त्यामध्ये खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध नाही. शाळा निवडण्यासाठी दहा पर्याय उपलब्ध असतात. त्यामध्ये इंग्रजी शाळा नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामध्ये महापालिका शाळांचाच पर्याय येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका शाळेत थेट प्रवेश मिळत असताना आरटीईमधून प्रवेश कशासाठी घ्यायचा अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. त्यामुळे आरटीईसाठी कमी प्रतिसाद मिळत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.