संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने भोसरी परिसरातील दोन रुग्णांना काॅलराची (cholera) लागण झाली आहे. त्या दोघांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले असून त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर आणखी तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले आहेत. त्यामुळे भोसरीतील धावडे वस्ती परिसरात जलजन्य आजार पसरल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागाकडून भोसरी परिसरातील अनेक भागात दूषित व गढूळ पाणी होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
भोसरी (Bhosari) येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीमधून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली.
यातून दुषित पाणी पुरवठा होऊन संबंधित दोन रुग्णांना काॅलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या दोन्ही रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
काॅलरा हा आजार दुषित पाण्यातून होतो. त्यानुसार धावडेवस्ती परिसरातील पाणी तपासणीसाठी घेण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाने पाणी पुरवठा विभागाला केली आहे.
तसेच गंभीर अतिसार कॉलराच्या इतर लक्षणांसह असतो. जसे उलट्या होणे, तहान लागणे, पाय दुखणे, चिडचिड होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, रक्तदाब कमी होणे असे आजार होतात. हा आजार टाळण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे किंवा अन्नपदार्थ खाणे टाळावे. असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी केले आहे. (Cholera in Bhosari)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.