संग्रहित छायाचित्र
इंद्रायणी नदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फेस येत असल्याने स्थानिक प्रशासनाबरोबरच महापालिकेवर टीकादेखील करण्यात आली. मात्र, हा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यामुळे तसेच, औद्योगिक पट्ट्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होत नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे, तर इंद्रायणीमध्ये थेट सांडपाणी मिसळत असल्याचे दोन ठिकाण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे.
इंद्रायणी नदीपात्रात पांढरा फेस जमा होत आहे. तसेच, पाण्यास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यावरून पर्यावरणप्रेमी तसेच, वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात नदीत मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.
पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या घटनेकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे आरोपही होत आहेत.
या संदर्भात महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे विचारणा केली असता, पिंपरी-चिंचवड शहरातील सांडपाण्यामुळे हे प्रकार घडत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व नाले ड्रेनेजवाहिनीद्वारे एसटीपी केंद्रांस जोडण्यात आले आहेत. तसेच, शहरातील औद्योगिक परिसरातील रासायनिक सांडपाणी नदी व नाल्यात मिसळत नसल्याचे स्पष्ट केले
तर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत चिखली कुदळवाडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. औद्योगिक पट्ट्यातील रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याच्या शंकेला या वस्तुस्थितीमुळे बळकटी मिळाली आहे. त्यामुळे सर्व निर्माण झालेल्या सांडपाण्यावर पालिका प्रक्रिया करते हा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. याबाबत महापालिकेने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत उद्योग व वर्कशॉप निर्माण झाले आहेत. त्यातून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे. या प्रकाराचा शोध घेऊन प्रदूषण मंडळाने संबंधित उद्योगांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पसाठी मागवली माहिती
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबवण्याबाबत राज्य शासनाकडून पावले उचलल्या सुरुवात केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अखत्यारित असलेले डीपीआर हे राज्य शासनाकडून मागवण्यात आलेले आहे. त्यानुसार मंत्रालयाकडून या प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.