संग्रहित छायाचित्र
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. त्याचवेळी मध्यरात्री नियंत्रण कक्षाला हत्येच्या धमकीचा खोटा कॉल आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
आळंदी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासादरम्यान डिग्या उर्फ दिगंबर विठ्ठल कदम (वय ३५, रा. आळंदी) यांच्याकडे बेकायदा गावठी शस्त्र असल्याचे आढळले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शस्त्र जप्त केले आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे बेकायदा शस्त्र तस्करीच्या संदर्भात तपास सुरू आहे.
दरम्यान, मध्यरात्री १२.२२ मिनिटांनी पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीकडून " चिखली परिसरात माझी हत्या करण्याचा प्रयत्न होणार आहे," असा घाबरवणारा कॉल आला. कॉल गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याची व्यवस्था केली. मात्र, दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर असा कोणताही प्रकार घडल्याचे दिसले नाही.
घटनास्थळी काहीही न आढळल्याने पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन बंद असल्याने पुढील माहिती मिळू शकली नाही. या खोट्या कॉलमुळे पोलिसांचा वेळ नाहक वाया गेली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खोट्या कॉलच्या घटनेवर नाराजी व्यक्त करत नागरिकांना अशा गैरप्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. "खोट्या कॉलमुळे अनावश्यक वेळेचा अपव्यय होतो आणि तातडीच्या सेवांवर परिणाम होतो," असे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वर्षाच्या पहिल्या दिवसातच दाखवलेली तत्परतेने कौतुक होत आहे. बेकायदा शस्त्र प्रकरणात आरोपीला अटक करून पोलिसांनी गुन्हेगारांना आवश्यक संदेश दिला आहे.