संग्रहित छायाचित्र
मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी (दि.५ जानेवारी २०२५) सकाळी आठ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी, जय गणेश बॅक्वेट हाॅलमध्ये होणार आहे.
या संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादा गावडे हे संमेलनाध्यक्ष पद भूषवणार आहेत. तर स्वागत अध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सचिव रामभाऊ सासवडे, निमंत्रण अरुण बोऱ्हाडे, उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, कार्याध्यक्ष सोपान खुडे, सदस्य डॉ. पौर्णिमा कोल्हे, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर व इतर सदस्य उपस्थित होते.
उद्घाटनापूर्वी श्री नागेश्वर महाराज मंदिर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी (संमेलन स्थळ) पर्यंत सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, आमदार महेश लांडगे, आमदार बाबाजी काळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते अक्षर इंद्रायणी या स्मरणिकेचे आणि काल भवताल या कथासंग्रहाचे श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते "स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा" या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी दहा वाजता "ज्ञानेश्वरी - काळाची गरज" या परिषदेचे उद्घाटन डॉ. आरती दातार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिसंवादात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव, हभप ॲड. यशोधन महाराज साखरे, योगी निरंजनाथ गुरु शांतिनथ, ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक रामदास जैद आदी सहभाग घेणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले तर समन्वयक म्हणून डॉ. सीमा काळभोर काम आहे.
दुपारी दोन वाजता संमेलनाध्यक्ष दादाभाऊ जयवंत गावडे यांची ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी तीन वाजता, डॉ. सदानंद मोरे यांची संदीप तापकीर प्रकट मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता 'दुर्ग भटकंती' या अरुण बोराडे यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. माधवराव सानप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर समारोप सत्रात ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी वैद्यकीय सेवा डॉ. अनिल कुमार रोडे, प्रशासन सेवा कार्य संजय गोपाळ शिंदे, इतिहास संशोधन दत्तात्रय दगडू फुगे, अग्निशमन सेवा कार्य सुनील तानाजी गिलबिले, प्रशासकीय सेवा परीक्षा स्मिता प्रतीक थोरवे, प्रो कबड्डी खेळाडू अनुज काळूराम गावडे, वैद्यकीय संशोधन कार्य डॉ. मधुरा मल्हारी काळभोर, युवा कीर्तनकार हभप विठ्ठल महाराज गवळी, हभप संग्राम बापू भंडारे, हभप मंगेश महाराज सावंत, साहित्य व समाजसेवा दत्तात्रय विघ्नहर अत्रे, सीए परीक्षा उत्तीर्ण सम्यक राहुल धोका आणि सिद्धांत राहुल धोका आदींना "भूमिपुत्र पुरस्कार २०२४" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता, शिवांजली साहित्य परिषदेचे प्रवर्तक शिवाजीराव चाळक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, संतोष घुले, समन्वयक डॉ. पौर्णिमा कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत.