Pimpri-Chinchwad: शाळांना दिली अग्निशामक सुरक्षेची जबाबदारी

आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये अग्निशामक सुरक्षेची पूर्तता होते की नाही, हे पाहिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी ६७३ शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. ज्या शाळांकडून सुरक्षाविषयक पूर्तता केली जाणार नाही. त्यांना अग्निशमन विभागाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 01:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शाळांना दिली अग्निशामक सुरक्षेची जबाबदारी

आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये अग्निशामक सुरक्षेची पूर्तता होते की नाही, हे पाहिले जाणार आहे.  त्यासाठी  महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी ६७३ शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. ज्या शाळांकडून सुरक्षाविषयक पूर्तता केली जाणार नाही. त्यांना अग्निशमन विभागाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांपाठोपाठ शाळांमध्ये अग्निसुरक्षेची काय व्यवस्था आहे, याची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे. या कार्यवाहीचा पहिला टप्पा म्हणून शाळांना अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल.

या मुदतीमध्ये त्यांनी आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे व अन्य बाबी बसविणे, बसविलेली उपकरणे सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतरही शाळांकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्यास 'अग्निसुरक्षा अधिनियम-२००५' नुसार संबंधित शाळांविरोधात अग्निशमन दलाकडून कार्यवाही केली जाणार आहे.

महापालिका अग्निशमन दलाने आत्तापर्यंत अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी शहरातील विविध ३ हजार ८१२ आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. ४८२ आस्थापनांची अग्निशमन दलाच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तर १७२ जणांना व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शाळांनादेखील याची पुर्तता करावी, हे आवाहन महापालिका अग्निशमन विभागाकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या सूचनेनुसार शाळांमध्येदेखील अग्निसुरक्षेला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्याकरिता शाळांनी अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्र पत्र घेतले आहे किंवा नाही, याची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरात शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहे.  - मनोज लोणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Share this story