‘रुफटॉप’ पेटण्यापुर्वी ‘जमिनी’वर आणणार

अग्निशमन दलाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम राबवत शुक्रवारी (दि. २६) पिंपरी - चिंचवडमधील २५ रूफटॉप हॉटेलला नोटीस बजाविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हॉटेल्स-रेस्टारंट आणि बारमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 27 May 2023
  • 05:21 pm
‘रुफटॉप’ पेटण्यापुर्वी ‘जमिनी’वर आणणार

‘रुफटॉप’ पेटण्यापुर्वी ‘जमिनी’वर आणणार

पिंपरी-चिंचवडमधील २५ रूफटॉप हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बंद, अग्निशमन दलाने अचानक तपासणी केल्यानंतर बजावली नोटीस

 रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_Mirror

 

अग्निशमन दलाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम राबवत शुक्रवारी (दि. २६) पिंपरी - चिंचवडमधील २५ रूफटॉप हॉटेलला नोटीस बजाविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हॉटेल्स-रेस्टारंट आणि बारमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड-हिंजवडी, रहाटणी, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अनेक रूफटॉप हॉटेल्स आहेत. परंतु, यातील एकाही हॉटेल्सना महापालिका अथवा अग्निशमन दलाने परवानगी दिली नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही ही हॉटेल्स बिनदिक्कतपणे सुरू असून, यामध्ये सातत्याने वाढच होत आहे. शुक्रवारच्या तपासणी मोहिमेनंतर अग्निशमन दलाने १५ बाबींची पूर्तता १५ दिवसांत करण्याचे आदेश या हॉटेलचालकांना दिले आहेत.

नोटीस बजावण्यात आलेल्या २५ पैकी बरीचशी हॉटेल्स राजकीय नेत्यांच्या मालकीची आहेत. हिंजवडी हा परिसर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारित असला तरी तो महापालिकेत समाविष्ट नाही. त्यामुळे हिंजवडीतील हॉटेल्सची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश रूफटॉप हॉटेल्समध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने मद्यविक्री केली जाते. परंतु, मद्यविक्री करण्यासाठी बार आणि रेस्टॉरंट्सना अग्निशमन दलाच्या परवानगीची आवश्यकता असते. मात्र ही परवानगी नसतानाही अन्य परवाने या हॉटेल्सना कसे मिळाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

पुढील १५ दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीद्वारे सर्व हॉटेलमालकांना कळविण्यात आले आहे. रूफटॉप हॉटेल्सना परवानगीच दिली जात नसल्याने आता हे हॉटेलमालक अग्निशमन न विभागाने मागितलेल्या १५ परवानग्या न आणणार कुठून, हा देखील प्रश्न आहे. तसेच या हॉटेलमालकांनी १५ परवानग्यांची कागदपत्रे सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का ? की केवळ कागदोपत्री घोडे नाचविले जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

उन्हाळ्यामुळे सध्या विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आणि अन्य कारणांमुळे आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील इमारती, हॉटेल, मॉल, शाळा, हॉस्पिटल आदी ठिकाणच्या आगप्रतिबंधक उपाययोजनांची नव्याने तपासणी करण्यात येत आहे. त्यात ही धक्कादायक बाब उघड झाली, असे महापालिका सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी म्हटले आहे.

 ही कागदपत्र सादर करण्याचे आहेत आदेश

  • बांधकाम परवानगी विभागामार्फत इमारतीचा संपूर्ण नकाशा संच
  • बांधकाम परवानगी विभागामार्फत मिळणारे भोगवटा प्रमाणपत्र/पूर्णत्वाचा दाखला
  • अग्निशमन विभागाकडून दिला जाणारा तात्पुरता, सुधारित आणि अंतिम तथा भाग अंतिम ना हरकत दाखला
  • हॉटेल व्यवसायासंदर्भात वैध कालावधीत वार्षिक नूतनीकरण केलेला अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला
  • शासन मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सीमार्फत स्थायी अग्निशमन यंत्रणा बसविल्याबाबत मिळणारा फॉर्म '' आणि ही यंत्रणा चालू स्थितीत कार्यान्वित असल्याबाबतचा फॉर्म 'बी'
  • फूड लायसन्स
  • शॉप अक्ट लायसन्स
  • आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे हॉटेल व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  • इलेक्ट्रीसिटी सेफ्टी प्रमाणपत्र
  • एलपीजी गॅस सुरक्षितता आणि सप्लाय प्रमाणपत्र
  • हॉटेल जागामालक भागीदारीपत्र किंवा मालकीहक्क पत्र
  • हॉटेल भाडेकरारनामा
  • मद्यसाठा आणि विक्री होत असल्यास त्याचे लिकर लायसन्स
  • चालक-मालकांचे वैध ओळखपत्र
  • महापालिकेच्या आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest