कारवाई होताच ६२ पिंपरी चिंचवडकरांनी भरला तत्काळ कर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने ६८ थकबाकीदारांची घरे, दुकाने मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारताच त्यापैकी ६२ जणांनी तत्काळ कर भरला. उर्वरित सहा मालमत्ता सील करण्याची कारवाई महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाकडून करण्यात आली.
थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कर भरणा करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेचा कर संकलन आणि कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २०२३ - २४ या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीमध्ये ५८५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागामार्फत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर संकलन विभागाने ४१,३०७ जणांना जप्ती नोटिसा तर ३६,७१९ मालमत्ताधारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ताधारकांकडे ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या सुरुवातीला बिगर निवासी व मोकळ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
कर आकारणी विभागाकडून ३ ऑक्टोबरपासून जप्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत २,१८४ मालमत्ताधारकांना जप्ती अधिपत्रे दिली आहेत. यापैकी १९४८ मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये ६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. महापालिकेडून जप्तीचा आदेश येताच ६२ थकबाकीदारांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश स्वरुपात जमा केले. जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जप्ती मोहिमेची माहिती दिली जाणार आहे. थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत, असे महापालिकेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
"महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध सवलत योजना, माहिती यासह जनजागृती, थकबाकीदारांची माहिती व्हॉट्सअपवरून प्रसारित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे," अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख (कर आकारणी व कर संकलन विभाग) यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.