तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू, मृतांचा आकडा १३ वर
पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. यामध्ये जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोमल चौरे (वय ३५) यांचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास निधन झाले आहे.
तळवडे येथील एका कारखान्यामध्ये ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे ९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे १४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर जखमी महिला सुमन गोधडे (वय ४० वर्षे) यांचे रात्री दोन वाजता निधन झाले.
सुमन गोधडे यांच्या निधनांतर तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १२ इतकी झाली होती. तर या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, चार जखमी रुग्णांपैकी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोमल यांचा सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे, आता मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर ससून रुग्णालयात तीन जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.