संग्रहित छायाचित्र
तीर्थक्षेत्र आळंदीजवळ असलेल्या सोळू गावात ॲल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी आहेत. काही जखमींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी कंपनीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कच्ची स्फोटके साठवून ठेवल्याने हा स्फोट झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. (Solu Fire News)
रामचंद्र मारुती निंबाळकर (वय ८१), संतोष त्रंबक माने (दोघे रा. सोळू), नवनाथ पांचाळ (वय ५५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेत बेबीताई ठाकूर (वय ७०), नंदा संतोष शेळके (वय ३५), रणवीर विलास गावडे (वय ३), चंद्रकांत बबन निंबाळकर (वय ७०), मोनू गौतम (वय २५), दिनेश रामकिसन मौर्य (वय २०), दीपक सदाशिव ठाकूर (वय ४७), गणेश रामचंद्र कोटंबे (वय ३६), श्रुती सोमनाथ ठाकूर (वय ४), विठ्ठल भाऊ ठाकूर (वय ७०), निवृत्ती लक्ष्मण ठाकूर (वय ६५), मनीषा बबन फुलशेटे (वय ३७), बसवराज बनसोडे (वय ४०), नागेश दिलीप ठाकूर (वय ३०), उमेश दिलीप ठाकूर (वय २६), शिवांश नागेश ठाकूर (वय ४), अमेंद्र रामविजय पासवान (वय २३), रणजीत हरिश्चंद्र पासवान (वय १९, सर्व रा. सोळू), अब्दुल कलाम खान (वय ५०, रा. चिखली) असे १९ जण जखमी झाले आहेत.
सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा. लि. ही कंपनी आहे. ही कंपनी मागील चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असतानादेखील कंपनीमध्ये ॲल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळी या कच्चा मालाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये जागेवरच एकाचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान, अन्य दोघांचा बळी गेला.
या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा स्फोट विद्युत रोहित्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रोहित्र सुस्थितीत असून त्यातून होणारा विजपुरवठा बंद होता. तसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर पडल्याने रोहित्राचे खांब वाकले गेले होते. घटनेत बाधित झालेल्या घरांचे, गोठ्यांचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून केले जाणार आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.