प्रशासक गिरवताहेत लोकप्रतिनिधींचा कित्ता
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त प्रतिनिधींप्रमाणे महापालिका प्रशासक आणि अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेपूर्वीच निविदा, कामे मंजूर करून घेण्याचा सपाटा सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी लोकप्रतिनिधींचा कित्ता गिरवत एका आठवड्यात दोनदा स्थायी समितीची बैठक घेतली. त्यात शुक्रवारी (१ मार्च) झालेल्या बैठकीत अडीचशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे.
दोन वर्षांपासून प्रशासकांमार्फत महापालिकेचा कारभार सुरू आहे. महापालिकेच्या लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे अधिकार देखील प्रशासक म्हणून आयुक्तांकडे आहेत. सत्ताधारी पदाधिकारी असताना स्थायी समिती सभापतींची मुदत संपताना किंवा कोणत्याही निवडणुकीची आचारसंहिता लागत असताना निविदा काढणे व कामे मंजूर करून घेण्याची लगीनघाई केली जाते. अगदी तसाच प्रकार प्रशासकीय कारभारातही फायदा मिळत आहे. आचारसंहिता लागण्याच्या धास्तीमुळे शुक्रवारी मोठ्या संख्येने कामांचे प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केले. प्रामुख्याने पिंपरी चौक ते दापोडी रूपये ९३ कोटी रूपये खर्च, रस्ते विकास अंतर्गत पिंपरी चौक ते निगडी भक्ती-शक्ती ५९ कोटी, मुकाई चौक ते चिखली रस्ता सुशोभिकरणासाठी १४ कोटी व भक्ती-शक्ती ते मुकाई चौक १७ कोटी या खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. तसेच महापालिका शाळा इमारतींची स्थापत्य विषयक कामे, कचरा संकलन व अलगीकरण जनजागृतीसाठी मुदतवाढ, शाळा इमारतींची स्वच्छ्ता मुदतवाढ, अशा प्रमुख कामांचा समावेश आहे. यासह चेंबर्स साफसफाई, रस्ते डांबरीकरण, चर बुजविणे, जलनि:सारण नलिका बदलणे अशा असंख्य कामावर अडीचशे कोटी रूपयांचा खर्चास मंजुरी देण्यात आली.
आठवड्यातून दोनदा बैठक...
कोणत्याही निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून अधिक बैठका घेतल्या जातात. अनेक निविदा मंजूर केल्या जातात. हाच सपाटा आयुक्त शेखर सिंह यांनी कायम ठेवला आहे. त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी बैठक घेताना शंभरहून अधिक निविदा, कामांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर दोन दिवसानंतरच म्हणजे शुक्रवारी (१ मार्च) पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत अडीचशे कोटींच्या कामांना मान्य़ता दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.