अदानी ग्रुपची पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो कोटींची गुंतवणूक
अदानी ग्रुपशी संबंधित कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्स पिंपरी-चिंचवडमध्ये डेटा सेंटर सुरू करीत असून, फिनोलेक्स इंडस्ट्रीने पिंपरी येथील २५ एकर जमिनीचे लीज हक्क या कंपनीला ४७० कोटी रुपयांना विकले आहेत. दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी येथील फिनोलेक्स कंपनीच्याच जागेवर डेटा सेंटर सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे रोजगार निर्मिती बरोबरीनेच मोठी गुंतवणूक शहरात येत असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, त्याचबरोबर पोलीस विभागाने नव्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. (Adani Group in Pimpri Chinchwad)
सध्या हिंजवडी आयटी पार्क आणि तळवडे आयटी पार्क भागातील रस्ते, कचरा, विद्युत पुरवठा हे प्रश्न दहा -पंधरा वर्षांनंतरही कायम असल्याने किमान आता मुख्य शहरात महापालिका भवनसमोर येणाऱ्या कंपनीसाठी सोयी- सुविधा योग्य असाव्यात अशी सूचना आयटीयन्सकडून केली जात आहे.मोरवाडी (फिनोलेक्स) चौकातील फिनोलेक्स कंपनीच्या जागेतील २५ एकर जागेत मायक्रोसॉफ्ट कंपनी तीन टप्प्यात उभी राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक केली जात आहे. या चौकात पुणे मेट्रोचे पहिले स्टेशन हे पिंपरी आहे. त्याचबरोबर चिंचवड, पिंपरी रेल्वे स्टेशन अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. तसेच विमानतळही नजिक असल्याने या जागेची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हे सगळे होत असताना याच चौकात होणारी मोठी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे का असा सवाल ट्विटरवर विचारला जात आहे.
तळेगाव दाभाडे येथील नियोजित प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याने मध्यंतरी बराच राजकीय गदारोळ झाला होता. याच तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात असलेल्या असंख्य समस्यांमुळे, सध्या अनेक कंपन्या त्रस्त आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट पाठोपाठच आता अदानी उद्योग समूहाशी संबंधित टेराविस्टा डेव्हलपर्सने शेकडो कोटींची गुंतवणूक केल्याने शहरातील मूलभूत सोयीसुविधा आणि समस्या सोडवण्याची मागणीही होऊ लागली आहे.
अदानी कोनेक्सद्वारे डेटा सेंटर चालवले जाते. २०३० पर्यंत भारतातील टॉप ३ डेटा सेंटर ऑपरेटर बनण्याचे अदानी कोनेक्सचे धेय्य असल्याचे कंपनीने यापूर्वी जाहीर केले होते. पुढील दहा वर्षात १ गिगा वॅट डाटा सेंटर क्षमता विकसित करण्याची योजना आखल्याचेही अदानी ग्रुपने नुकतेच जाहीर केले आहे. अदानी ग्रुपने या डेटा सेंटरसाठी अमेरिकास्थित एज-कोनेक्स कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या शहरातील विविध शासकीय विभागांनी दिल्या आहेत. अनेक कंपन्या बाहेर जाण्याची कारणे काय याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पुण्यात एखादी कंपनी येताना वाहतूक कोंडी, कचरा, पाणी या गोष्टींवर प्रथम चर्चा करीत असतात. आता बहुतांश कंपन्यातून वर्क फ्रॉम होम धोरण संपुष्टात आणले आहे. त्यामुळे नव्या कंपन्या शहरात येत असताना त्यांना पोषक वातावरण निर्माण करण्याची शासनाची आणि संबंधित विभागांची जबाबदारी असल्याचे मत आता आयटीयन्स व्यक्त करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.