Pimpri Chinchwad : मेट्रो स्थानकालगत बेशिस्त वाहनांवर होणार कारवाई

पीसीएमसी ते दिवाणी न्यायालय (पुणे) पर्यंत धावणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे (Metro) प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे रस्त्यावर होणारी वाहनांची संख्या कमी होत असली तरी, प्रवाशांच्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 15 Mar 2024
  • 05:37 pm
Pimpri Chinchwad News

मेट्रो स्थानकालगत बेशिस्त वाहनांवर होणार कारवाई

पीसीएमसी ते दिवाणी न्यायालय (पुणे) पर्यंत धावणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे (Metro)  प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे रस्त्यावर होणारी वाहनांची संख्या कमी होत असली तरी, प्रवाशांच्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली. यामुळे अखेर दापोडी ते पिंपरी या मार्गावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरू केली आहे. तरी, वाहनचालकांनी अशाप्रकारे वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Pimpri Chinchwad News)

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. त्यात समतल विलगक (ग्रेड सेपरेटर), बीआरटीसाठी स्वतंत्र मार्गिका, आता मेट्रोकडूनही स्वतंत्र पार्किंग व्यवस्था सुरू केली आहे. करोडो रुपये खर्चून मेट्रो आणि त्याची स्थानके उभारण्यात आली. मात्र, ही मेट्रो स्थानकेच वाहतूक कोंडीची मुख्य कारण बनू लागली आहेत.

पुणे मेट्रोकडून पीसीएमसी आणि संत तुकारामनगर या दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानकालगत जवळपास ९० वाहने आणि संत तुकारामनगर स्थानकालगत १४० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे. मात्र, अद्यापी मेट्रो प्रवासी हे रस्त्यालगत अथवा पदपथावर वाहने पार्क करतात. त्यामुळे पादचारी रस्त्यावरती आले असून, वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावी लागली आहे.

दरम्यान, याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता, सद्यस्थितीत वाहनचालकांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. वाहने पार्क करताना इतरांना व वाहतूक कोंडीला त्रास होऊ नये, अशा ठिकाणी पार करावेत. मात्र, काही वाहनचलक हे वाहतूक नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

महिना उलटून गेल्यावरही पार्किंग व्यवस्था नाहीच

मेट्रोकडून सुरू करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था अद्याप सुरू झाली नाही. १५ फेब्रुवारीला मेट्रो प्रशासनाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही ८  ठिकाणी पार्किंग व्यवस्थेबाबत दर जाहीर केले होते. प्रत्यक्षात महिना उलटूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत पुणे रेल्वे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सक्षम पार्किंग आणि फिडर द्या

मेट्रोला फिडर आणि पार्किंग द्या, तोपर्यंत कारवाई थांबवा. शहराचे हवा प्रदूषण थांबणे जास्त महत्त्वाचे आहे, अशी मागणी शहरातील सामान्य नागरिकांनी केली आहे. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मेट्रो व महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडकर जागरूकतेने ट्राफिकमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील राहून मेट्रोला पसंती देत आहेत. पार्किंगअभावी रस्त्यालगत आपली वाहने पार्क करून मेट्रोने जात आहेत, पण हक्काची पार्किंग न देणारी यंत्रणा नसल्याने कारवाईची भीती प्रवाशांमध्ये असल्याचे गणेश बोरा यांनी सांगितले.

रस्त्यांवरती होणारी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूक विस्कळीत होते. परिणामी, अशा बेशिस्त वाहनांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार आहे.

-शहाजी पवार, पोलीस निरीक्षक, 

पिंपरी वाहतूक विभाग

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest