एक लाखासाठी तरुणाचे अपहरण
उसणे घेतलेले १ लाख रुपये परत देत नसल्याने तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर तरुणाला रुममध्ये कोंडून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार वाकड परिसरात घडला. या प्रकरणी दोन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
आमान आमिन शेख (वय २१ वर्षे, रा. देहुरोड) आणि रफिकभाई मेहबुब शेख (वय २८, रा. श्रीकृष्णनगर, देहुरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी जावेद आरिफ खान (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) याने पोलीसांत तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. जावेदने आमानकडून १ लाख रुपये उसणे घेतले. परंतू, जावेदने ते वेळेवर परत केले नाही. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी आमान आणि रफिकभाईने इतर दोन मित्रांच्या मदतीने तरुणाला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवले.
त्यानंतर तरुणाला देहूरोड येथील नदीच्या किनारी नेऊन हाताने व रॉडने बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणाला कारमधून लिंक रोड येथील रमाबाईनगरमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये आणले. आमानने तरुणाच्या भावाला आणि वडीलांना फोन लावून पैशांची मागणी केली. पैसे मिळत नाहीत तो पर्यंत तरुणाला फ्लॅटमधील एका रूममध्ये कोंडुन ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.