जगण्याची नवी दिशा! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपक्रमामुळे बालगुन्हेगारीत २३ टक्क्यांची घट

पिंपरी-चिंचवड: क्षणिक मोहापायी किंवा अनावधानाने गुन्हेगारीचा कलंक माथी आलेल्या बालकांमधील गुण ओळखून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचा अनोखा उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने राबविला आहे.

संग्रहित छायाचित्र

अल्पवयीनांच्या डोक्यावरील गुन्हेगारीचा कलंक मिटला, आमिर खाननेही केले कौतुक

पिंपरी-चिंचवड: क्षणिक मोहापायी किंवा अनावधानाने गुन्हेगारीचा कलंक माथी आलेल्या बालकांमधील गुण ओळखून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचा अनोखा उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने राबविला आहे. या उपक्रमामुळे बालगुन्हेगारीत तब्बल २३ टक्क्यांची घट झाली आहे. पूर्वी गुन्हेगारीच्या वाटेवर चालणाऱ्या या मुलांच्या जगण्याला पोलिसांमुळे नवी दिशा मिळाली आहे. (Pimpri Chinchwad News)

ज्या कोवळ्या वयात हातात वही-पुस्तक घ्यायचे... भविष्याची स्वप्न रंगवायची... खेळ-साहस आणि बळाच्या आधारे आपले किशोरवयीन जीवन उज्ज्वल करायचे, त्या वयात कोवळ्या हातांना गुन्ह्यांचा काळा डाग लागतो. नकळत घडलेल्या आणि कधी जाणीवपूर्वक केलेल्या गुन्ह्यांचा कलंक माथी बसतो. आपल्यासोबतच परिवाराचेही जगणे अवघड होऊन जाते. अशा वाट चुकण्याच्या वयातच योग्य मार्गदर्शन दिले तर त्यांची भरकटणारी पाऊले सन्मार्गाला लागतील. स्वत:चे आणि समाजाचे भले त्यातून साधले जाईल, अशा उदात्त हेतूने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे शेकडो अल्पवयीन मुलांच्या जीवनाची 'दिशा'च बदलली आहे.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमामुळे बालगुन्हेगारीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २३ टक्के घट झाली आहे. एवढेच नव्हे तर, बाल गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या परंतु, उपक्रमातून सुधारलेल्या अनेक मुलांनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवर आपले नाव चमकवले आहे. 

‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून समाजातील उदात्त आणि मांगल्य समोर आणणारा बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने स्वत: आयुक्तालयात येऊन या उपक्रमाची माहिती घेतली आणि पोलिसांचे तसेच या मुलांचे कौतुक केले.

गुन्हेगारीकडे झुकलेल्या अथवा थेट गुन्ह्यात सहभाग असलेल्या ४८३ मुलांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हेरून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिशा हा उपक्रम सुरू केला होता. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यात त्यांची बदली झाली. त्यानंतर शहराचे सध्याचे आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या उपक्रमात अनेक आमूलाग्र बदल केले असून, अभिनेता आमिर खान याने आपली माजी पत्नी आणि प्रोड्युसर किरण राव हिच्यासह आयुक्तालयास भेट देऊन नुकतीच दिशा उपक्रमाची माहिती  घेतली.

दिशाहीन मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणणारे  पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आयुक्तालय आहे. सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या नेतृत्वात सध्या हा उपक्रम चालविला जात असून, आता 'दिशा' तिमिरातून तेजाकडे झेपावली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आणि आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अधिकृत ७२ झोपडपट्टीतील ४८३ मुलांचा कल गुन्हेगारीकडे झुकलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यातील १९२ मुले ही व्यसनाधीन झाली असून, २३१ मुलांनी अनेक कारणांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले होते.

शहरात वाहनांची तोडफोड, हाणामारी, सोनसाखळी हिसकावणे, खुनाचा प्रयत्न, खून अशा अनेक गंभीर गुन्ह्यात आत्तापर्यंत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग होता. गुन्हे दाखल करणे, या मुलांना ताब्यात घेणे आणि सुधारगृहात पाठवणे यापुढे जाऊन काहीतरी करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन सध्या सात पातळ्यांवर दिशा उपक्रम राबविला जात आहे.

दिशा उपक्रमांतर्गत फुटबॉल स्पर्धा तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने दिशा भरकटलेली बालके व्यसनाच्या आहारी गेलेली बालके, शाळाबाह्य बालके यांच्याकरिता व्यसनमुक्ती शिबिर, रोजगार निर्मिती तसेच व्यावसायिक प्रशिक्षण असे उपक्रम राबवून बालकांचे पुनर्वसन केले जात आहे.

दिशा उपक्रमासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली असून, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, हवालदार दीपाली शिर्के, अश्विनी शिंदे, अमोल मुठे, भूषण लोहरे आदींचे विशेष बालपथक हे काम करीत आहे. विशेष बालपथकासह शहरातील ३५ फौजदार सध्या आपापल्या पातळीवर या मुलांना स्पर्धांमध्ये उतरविण्यासाठी काम करीत आहेत. पोलिसांच्या वेल्फेअर फंडातून सुमारे पाच लाख रुपये या मुलांसाठी खर्च करण्यात आले असून, एम क्यूआर फार्मा आणि चाकण लघुउद्योग संघटनेने मिळून १० लाख रुपये या उपक्रमासाठी आत्तापर्यंत देऊ केले आहेत.

२०२२ मध्ये शहरात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ४०९ प्रकरणात अल्पवयीन मुलांना सहभाग होता. तर त्यानंतर सुरू झालेल्या दिशा उपक्रमामुळे ही आकडेवारी २३ टक्क्यांनी खाली आली आहे. बऱ्याच प्रकरणांत वाहनांची तोडफोड का केली, असे पोलिसांनी या अल्पवयीन मुलांना विचारले असता, कोणतेच ठोस कारण समोर आले नव्हते. त्यामुळे या मुलांच्या  ऊर्जेचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने फुटबॉल मॅच भरविण्यासाठी इंजिनिअर असणाऱ्या संदेश बोर्डे यांची मदत घेण्यात आली होती.

बोर्डे यांनी ‘झुंड इन रिॲलिटी’ची अनुभूती मिळवून दिली आहे. आयटी कंपनीतील प्रशिक्षक संदेश बोर्डे यांनी दर शनिवार आणि रविवारी निरीक्षणगृहात जाऊन निवड झालेल्या विधी संघर्षित मुलांना प्रशिक्षण देत आहेत. यामुळे कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या ‘स्लम सॉकर’ या स्पर्धेत १६ राज्यातील टीमला हरवून महाराष्ट्राने जेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या या टीममध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोघा खेळाडूंचा समावेश होता. आता यापुढे जाऊन शहर पातळीवर तयार करण्यात आलेल्या ३५ टीमची दर आठवड्याला स्पर्धा घेतली जाणार आहे.

आपली वस्ती आणि गुन्हेगारीपलीकडे शहर खूप विस्तारले आहे. त्यामुळे या मुलांना आयटीनगरी पिंपरी-चिंचवडमधील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भेट देण्यासाठी नेण्याचे प्रयोजन आखले आहे. दिशा पथकाची मदत घेऊन या मुलांना आम्ही विविध कंपन्यांमध्ये घेऊन जाणार आहोत. जेणेकरून या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन ते मूळ प्रवाहात येतील, असे बोर्डे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest