मुळशीत आगळावेगळा 'झाडीपाडवा' साजरा
पंकज खोले
वणव्यात दरवर्षी जंगल जळून शेकडो वृक्षांचा ऱ्हास होतो. त्यामुळे निसर्ग संवर्धनाची चळवळ सुरू करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मारुंजीत (मुळशी) अनोख्या पद्धतीने 'झाडी पाडवा' उपक्रम पुढे आणला आहे. उंच गुढीची स्पर्धा करीत बांबू अथवा कोणतेही झाड तोडण्याऐवजी गावरान (रायवळ) आंब्याच्या दहापेक्षा अधिक रोपांची घराभोवती व मोठ्या पिंपात लागवड करत त्यावरच गुढी बांधण्यात आली. हा आगळावेगळा 'झाडी' पाडवा पर्यावरणप्रेमी मुळशी ग्रामस्थांसाठी कुतुहलाचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.
संपूर्ण गाव पूर्वीसारखे आमराईने बहरलेले करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जुन्या पिढीतील कोंडाबाई जगताप यांच्या हस्ते गावरान आंबा रोपाची लागवड केली गेली. तसेच वृत्तपत्र क्षेत्राची बाराही महिने नित्यनेमाने घरपोच सेवा देणारे गावातीलच वृत्तपत्र विक्रेते तानाजी गायकवाड यांच्या शुभहस्ते त्यावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली.या वेळी अंकुश जगताप, राजस्थानमधील बांधव मांगीलाल देवासी, हेमंत देवासी आदी उपस्थित होते.
स्व. राजीव गांधी हिंजवडी आयटी पार्कच्या टप्पा एकलगत मारुंजी गावात दोनशे एकर वनक्षेत्र आहे. मात्र दरवर्षी अनेकदा वणवे लागून जंगल भस्म होते. जंगलात बेकायदेशीर प्रवेश करीत भटकंती करणाऱ्या मंडळीपुढे वनविभाग हतबल झाल्याचे दृष्य दिसते. परिणामी जंगलातील झाडे, झुडपे, औषधी वनस्पती आदी जैवविविधता नष्टच झाली आहे. जंगलात पाणवठे नष्ट झाले, खासगी दऱ्यातील पाणवठे विकासकाने अडथळे निर्माण केले. त्यामुळे जंगलातील ससे, मोर, भेकर, डुक्कर तीन किलोमीटर दूर हिंजवडी शिवेलगत असलेल्या जगताप मळा परिसरात जीव वाचवायला आमराईपर्यंत येत आहेत. अनेक जीव तडफडून मरत आहेत. त्यातच दरवर्षी गुढी उभारायला वनक्षेत्रातील बांबू बनातील शेकडो बांबू सर्रास तोडले जातात. तुझी गुढी उंच की माझी अशी गाव परिसरातील जणू स्पर्धाच लागली आहे. दुचाकीवरून जंगलात जायचे आणि बांबू बुडापासून कापून न्यायला चार दिवसात रीघ लागते. ते पुढे दुप्पट ते तिप्पट किमतीने विकले जाते.
आता जंगले भकास झाली
जंगलतोड बेसुमार वाढली आहे. त्यातच यावर्षी भयंकर दुष्काळ अन् चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट आहे. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी 'झाडी पाडवा' उपक्रम हाती घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. झाडे लावून जिवंत गुढी उभारण्याची खरी गरज आहे. त्यातून रखरखत्या उन्हापासून सुटका होऊन गावभर सावली अन् गारवा वाढेल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावरान आंबे तसेच झाडांचे देशी वाण लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.