सकाळच्या धावपळीला ब्रेक !, चिमुकल्यांसह पालकांनाही दिलासा

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ निर्धारित केली असून या निर्णयानुसार शहरातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या महापालिका, खासगी शाळांचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरवले जाणार आहेत.

School time

सकाळच्या धावपळीला ब्रेक !, चिमुकल्यांसह पालकांनाही दिलासा

शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे जूनपासून चौथीपर्यंतच्या शाळा ९ वाजता

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ निर्धारित केली असून या निर्णयानुसार शहरातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या महापालिका, खासगी शाळांचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरवले जाणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. (Pimpri Chinchwad) 

या परिपत्रकानुरूप शाळा व्यवस्थापक, पालक, शिक्षण संघटनांची बैठक घेऊन एकत्रित समन्वय साधून आगामी २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांना अत्यंत अपरिहार्य कारणांमुळे काही अडचण आल्यास त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पालिकेसह खासगी शाळांची वेळ बदलल्यामुळे पालकांची धावपळ निश्चित थांबणार आहे.  (Shcool Time)

राजभवनातील एका कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ८० टक्के शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातात.अनेक भागात लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळादेखील सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यामुळे मुलांचे डब्बे बनवण्यासाठी पालकांना पहाटे लवकर उठून धावपळ करावी लागते. तसेच मुलांना पहाटे सहापासून उठून दप्तराची आवराआवर करावी लागते. या धावपळीत मुलांची झोपही पूर्ण होत नाही. शिवाय पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.

शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळादेखील सकाळच्या सत्रात भरतात. खासगी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळादेखील सकाळच्या ७ ते ८ च्या सुमारास भरत आहेत. महापालिकेसह खासगी शाळांना अनेकदा अपु-या इमारतीमुळे दोन टप्प्यात ह्या शाळा भरवाव्या लागत आहेत. यात पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्ग हे सकाळच्या सत्रात भरवण्यात येत होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात माध्यमिक वर्ग भरवले जात होते.

शासनाच्या अध्यादेशानुसार सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ च्या अगोदरची आहे, त्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी लागणार आहे.

दरम्यान, शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता शाळा व्यवस्थापनास घ्यावी लागणार आहे. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांची वेळ सकाळी नऊनंतर बदल्यास निश्चित पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबण्यास मदत होणार आहे.  

यामुळे घेतला निर्णय

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून आले. बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरात उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनिप्रदूषण (उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत) विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपतात. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होतो. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसावलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी दिसून येतो. त्याचा नकारात्मक परिणाम अध्ययनावर होतो. हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे, थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते अनेकदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळेही पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पावसामुळे अडचणी निर्माण होतात. शाळेच्या वेळेत बदल करताना शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

शहरात महापालिकेसह सर्व माध्यमांच्या खासगी शाळांची वेळ सकाळी ७ ते ८.३० पर्यंत भरवल्या जातात. तब्बल ८० टक्के शाळांची वेळ सकाळची आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत बदलण्यासाठी समन्वय साधून निर्णय घ्यावा लागेल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. महापालिकेसह सर्व माध्यमांच्या खासगी शाळांच्या वेळा देखील बदलण्यात येणार आहे. हे बदल करताना पालक, शाळा व्यवस्थापन कमिटी, शाळा व्यवस्थापक, शिक्षण संघटना यांची बैठक घेऊन सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यानंतर शाळेच्या वेळा बदलल्याचे शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात येईल. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी माध्यमिक शाळा सकाळी, त्यानंतर प्राथमिक शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यात येतील. याबाबत सर्वांशी चर्चा, विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यात येईल.

—संजय नाईकवडे - शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest