पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात ६०२ बालकांनी गमावला जीव; बालमृत्यूचे भीषण वास्तव आले समोर

पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचे भीषण वास्तव समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती यासह न्यूमोनिया, डायरिया या आजारांनी बालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

संग्रहित छायाचित्र

सहा वर्षांत तब्बल ३ हजार ३०५ बालकांचा मृत्यू

विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचे भीषण वास्तव समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती यासह न्यूमोनिया, डायरिया या आजारांनी बालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ० ते ५ वयोगटातील वर्षभरात ६०२ आणि सहा वर्षात तब्बल ३ हजार ३०५ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बालकांचे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब बनली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात १० रुग्णालये आणि २८ दवाखाने आहेत. यामध्ये सर्वात मोठे ७०० बेडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह शंभरहून अधिक बेडची जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी आणि भोसरी अशी मोठी रुग्णालये आहेत. याशिवाय आठ प्रसूतिगृहे, झोपडपट्ट्यांमध्ये २० आरोग्य केंद्र आहेत. ८ कुटुंब नियोजन केंद्र, ३८ लसीकरण केंद्र आहेत.

शहरात महापालिकेकडून रुग्णालये व दवाखान्यातून गर्भवती महिलांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सेवा, सुविधा  पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या आसपास आहे, तर जिल्ह्यातील चाकण, शिरूर, मावळ यासह अन्य भागातून महिला पालिकेच्या रुग्णालयात गरोदर माता उपचारासाठी शेवटच्या टप्प्यात येतात. त्यामुळे बालमृत्यूची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरात उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ० ते ५ वयोगटातील ६०२ तर सहा वर्षात ३ हजार ३०५ बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२२ मध्ये ४८८ बालकांचा मृत्यू झाला, तर २०२३ मध्ये मोठी वाढ होऊन हा आकडा ६०२ वर गेला आहे. गर्भवती महिला आणि प्रसूती दरम्यान  माता मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी त्यानंतर होणारे मुलांचे मृत्यू मात्र चिंतेची बाब आहे.

हे करावेत उपाय

एकात्मिक बालविकास योजना प्रभावीपणे राबवणे, मातेचे कुपोषण रोखणे, झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषणाला प्रतिबंध करणाऱ्या आरोग्यविषयक योजना राबवाव्यात,  साथरोग व इतर संसर्गजन्य आजारावर नियंत्रण व त्यांच्या फैलावास प्रतिबंध करणे, महापालिकेच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे,  राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे, कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम राबवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे.

या कारणांनी होतोय बालकांचा मृत्यू

महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात बालकांचे झालेल्या मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. या बाल मृत्यूमागे अनेक कारणे आहेत. मातांना गरोदरपणात योग्य आहार न मिळाल्याने कमी वजनाची बाळे जन्माला येणे, कधी-कधी जास्त वजनांची बाळे जन्माला आल्याने अशा बाळांना मृत्यू  होतोय, नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे दिसून येतात. न्यूमोनिया, डायरिया या आजारांनी देखील बालकांचे मृत्यू होतात. त्याचबरोबर जन्मजात अनेक वेळा बाळांचा मृत्यू झालेला आहे. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ आली आहे.

बालमृत्यू रोखण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. पालिकेच्या वायसीएमसह, थेरगाव, आकुर्डी, जिजामाता, भोसरी रुग्णालयात एनआयसीयू विभाग सुरू केले आहेत. प्रत्येक रुग्णालयात बालरोगतज्ज्ञही उपलब्ध आहेत. आशा, एएनएम, वैद्यकीय अधिका-यांच्यामार्फत गरोदर मातांचे पहिल्या तीन महिन्यात नाव नोंदणी केली जाते. बाळ जन्माला आल्यापासून १ वर्षापर्यंत घरी भेटी देऊन तपासणी, लसीकरण केले जाते. यासाठी आशा एएनएम, वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण दिले जाते.
- डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest