पुलासाठी ४२ कोटींचा खर्च, उधळपट्टीसाठी २० कोटी!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या सांगवी ते बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासाठी सुमारे ४२ कोटींचा खर्च केला आहे. मात्र, असे असताना त्याच पुलासाठी पुन्हा २० कोटी खर्चाची नवी निविदा काढण्यात आली आहे. सुरुवातीला ४२ कोटींचा खर्च केला असतानाही पुन्हा त्याच पुलासाठी २० कोटींची उधळपट्टी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरास जोडणाऱ्या सांगवीजवळील स्पायसर महाविद्यालय येथील अरुंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहरास जोडण्यासाठी सांगवीतील ममतानगरमधील दत्त आश्रम मठ आणि पुण्याच्या बाजूला चंद्रमणीनगर येथे नव्याने पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सांगवी ते बोपोडी हा पूल ७६० मीटर लांबीचा दोन पदरी आहे. त्याची रुंदी १८.६० मीटर आहे.
सांगवीच्या बाजूने ८० मीटर व पुण्याच्या बाजूस ५५५ मीटरचा पोहोचरस्ता आहे. पुलासाठी ४१ कोटी ६३ लाख खर्चास स्थायी समितीने ११ सप्टेंबर २०२१ ला मंजुरी दिली होती. त्यातील निम्मा खर्च पुणे महापालिका देणार आहे. पुलाचे काम टी ॲण्ड टी कंपनी करत आहे. कामाची मुदत २ वर्षे होती. काम पूर्ण करून पूल वाहतुकीस जानेवारी २०२४ ला सुरू करण्याचे नियोजन होते.
मात्र, पुण्याकडील कृषी महाविद्यालयाची जागा उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले होते. अखेर, ती जागा उपलब्ध झाल्याने काम अंतिम टप्प्यात आल्याचे महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असताना याच पुलासाठी आणखी एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थापत्य प्रकल्प विभागाने १९ कोटी ६३ लाख ५६ हजार ३९६ रुपये खर्चाची निविदा नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पुलाची पूर्वीची निविदा प्रसिद्ध झालेली असताना त्याच कामासाठी नव्याने निविदा राबवून खर्च केला जात असल्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
सांगवी-बोपोडी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलावरील कमान, आकर्षक रचनेत सजावट आणि रेलिंग आदीं अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही १९ कोटी ६३ लाख खर्चाची नवी निविदा काढली आहे. या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. - संध्या वाघ, कार्यकारी अभियंता
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.