संग्रहित छायाचित्र
उमेदीच्या काळातील जमापुंजी गुंतवून आयुष्याची संध्याकाळ शांततेने व्यतीत करण्याचे ३६४ ज्येष्ठांचे स्वप्न परांजपे स्कीम्सच्या (Paranjpe Schemes) ‘अथश्री’ मधील घरांचा ताबा मिळण्यास विलंब होत असल्याने धूसर झाले आहे. गेल्या सात वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेले हे नागरिक हयातीत तरी घरी जायला मिळणार का, असा आक्रोश करत आहेत.
फॉरेस्ट ट्रेल्स भूगाव येथील ‘अथश्री’ बी-१ या स्कीममध्ये नोव्हेंबर २०१६ पासून तीनशे चौसष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी टप्प्याटप्याने घरांचे बुकिंग केले आहे. कोरोना कालावधीत कामगार नसल्याने बांधकामांचा ताबा देण्यास मुदतवाढ घेण्यात आली. परांजपे स्कीम्सनेही महारेराकडून दोन वेळेस फ्लॅटचा ताबा देण्यास मुदतवाढ घेतली होती. फ्लॅटचा ताबा देण्यास मुदतवाढ हवी असल्यास अथवा अन्य काही बदल करायचे झाल्यास एकूण फ्लॅटधारकांपैकी (बुकिंग केलेल्यांपैकी) ५१ टक्के जणांची लेखी संमती आवश्यक असते. सुरुवातीच्या दोन वेळेस भूगाव येथील ‘अथश्री’ बी-१ मधील ज्येष्ठांनी मुदतवाढीस संमती दिली होती. मात्र, त्यानंतर तिसऱ्यांदा मुदतवाढ घेण्यासाठी संमती घेतली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत सातत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या ‘परांजपे स्कीम्स’शी संबंधित लोकांबरोबर बैठका झाल्या. किरकोळ आणि क्षुल्लक कारणे देऊन फ्लॅटचा ताबा देण्यास विलंब केला जात असल्याचे नागरिकांनी ‘ सीविक मिरर’शी बोलताना सांगितले. सेल ॲग्रीमेंटनुसार जर सदनिकेचा ताबा देण्यास उशीर झाला तर फ्लॅटधारकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतु, आता नुकसान भरपाई देण्यासदेखील टाळाटाळ केली जात आहे. मला एकेकट्याने येऊन भेटावे, मग बघून घेईन अशी धमकीवजा भाषा वापरली जात असल्याचे ‘अथश्री’ बी-१ मध्ये फ्लॅट बुक केलेल्या मिलिंद बेंबळकर यांनी ‘ सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.
नोव्हेंबर २०१६ मध्ये फ्लॅट बुक केल्यावर गृहप्रकल्प जुलै २०२१ मध्ये पूर्ण होऊन ताबा मिळेल असे करार ग्राहक आणि बांधकाम कंपनीमध्ये झाला होता. परंतु, कोरोनामुळे काँट्रॅक्टर काम सोडून निघून गेला. कामगार मिळत नाहीत. आमच्याकडे (कंपनीकडे) पैसे नाहीत अशा असंख्य सबबी ग्राहकांना सांगण्यात आल्या आहेत.
ग्राहकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट मागितली तर भेट न देणे, ताटकळत ठेवणे, टाळाटाळ करणे तसेच आम्ही पाठविलेल्या पत्रांना उत्तरे न देणे हे आता नित्याचे झाले आहे. सातत्याने विलंब होत असल्याने आम्ही यापूर्वी अनेकदा बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर बैठक केली असून, त्यामध्ये समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीच्या अध्यक्षांशी आमची मीटिंग झाली. तेव्हा मार्च २०२४ पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे आम्हाला तोंडी आश्वासन देण्यात आले. परंतु, आजतागायत तेथे ताबा घेण्यायोग्य परिस्थिती नाही. राहायला जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची अद्याप पूर्तता झाली नसल्याचेही बेंबळकर यांनी सांगितले. अनेकांसह आम्ही घरे विकून आयुष्याची जमापुंजी या गृहप्रकल्पात गुंतविली होती. परंतु, वेळेवर घरांचा ताबा मिळाला नसल्याने आम्हाला सध्या घर भाडेतत्त्वावर घेऊन राहावे लागत आहे.
कोरोना कालावधीमुळे घरांचा ताबा देण्यास उशीर झाला. याबाबतची सर्व आवश्यक परवानगी आणि कायदेशीर तरतुदींचे आम्ही तंतोतंत पालन केले आहे. ‘अथश्री’ मधील जवळपास सर्वांना याची पूर्ण कल्पना असून, पुढील महिन्यात सर्वांना घरांचा ताबा देण्यात येणार आहेत.
– अमित परांजपे, परांजपे स्कीम्स
‘अथश्री’ बी-१ मध्ये मी सात वर्षांपूर्वी सत्तर वर्षांची असताना फ्लॅट बुक केला होता. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळची सात वर्ष वाट पाहण्यात गेली आहे. आमच्यातील अनेकांचे निधनही झाले आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यावर तत्काळ ताबा मिळेल असे आम्हाला डिसेंबर २०२३ मध्ये सांगण्यात आले होते. पण तेथे राहण्यायोग्य आवश्यक बाबींची अद्याप पूर्तता झालेली नाही. माझे जुने घर विकून मी बी विंगमध्ये घर बुक केले. पण अद्याप ताबा मिळाला नसल्याने मला ए विंगमध्ये भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. याठिकाणी सर्वच अनिश्चित असून, अजून असे किती दिवस आम्ही काढायचे असा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे.
– नीला देशमुख, फ्लॅट बुक केलेली ज्येष्ठ महिला
‘अथश्री’ बी-१ मध्ये फ्लॅट बुक केलेल्या जवळपास सर्वांची मुले परदेशात आहेत. आम्ही आयुष्याची जमापुंजी गुंतवून ही घरे घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी प्रत्येकाने किमान ९५ ते ९८ टक्के रक्कम भरलेली आहे. सॉफ्ट पजेशन घेण्यासाठी आम्हाला उद्युक्त केले जात आहे. परंतु, तेथे विद्युत पुरवठा, इलेक्ट्रीक मीटर, उद्वाहक, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वयंपाकाच्या गॅसची पाईपलाईनची, घनकचरा व्यवस्थापन आदींची अद्याप पूर्तता झालेली नाही. फ्लॅटचा ताबा मिळण्याच्या प्रतीक्षेत काही लोकांचे निधनही झाले असून, आता या सर्व प्रकारामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत.
– मिलिंद बेंबळकर, फ्लॅट बुक केलेले ज्येष्ठ नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.