पालिकेला यंदा गतवर्षीपेक्षा १६१ कोटींचे अधिक उत्पन्न

महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. ६ लाख २५ हजार मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.

संग्रहित छायाचित्र

कर संकलन विभागाकडे ९७७ कोटींचे उत्पन्न, ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी भरला कर

विकास शिंदे
महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. ६ लाख २५ हजार मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.

महापालिकेच्या (PCMC) उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत ६ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व आकारणी विभागाने गतवर्षी ८१६ कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल १६१ कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे,  बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात नावे प्रसिद्ध करणे, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया, मीम्स, रिल्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डिंग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मीडियाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पीकरवर थकबाकीदारांच्या नावांची घाेषणा करणे, जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात केली. मालमत्ताकर वसुलीसाठी नागरिकांना मालमत्ताकराची बिल ऑनलाईन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन कर सवलत योजना, थकीत कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्ती पूर्व नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली.

वाकड झोनमधून १५४ कोटीचा उच्चांकी कर वसूल

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १७ झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे ६८ हजार मालमत्ताधारकांनी १५४ कोटी ५८ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्या खालोखाल सांगवीत ५१ हजार ७१८, चिखलीत ४५ हजार ६३४, थेरगावमध्ये ४५ हजार ४३४, चिंचवडमध्ये ४३ हजार २८६, मोशी ३४ हजार ९८०,  भोसरी ३३ हजार ८६७ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त ८ हजार ५२७ मालमत्ताधारकांनी कर भरणा केला आहे.

यंदा सिद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गट महिलांकडून बिले वाटप, डाटा अनालिसिस, जनजागृतीसाठी उत्तम क्रिएटिव्ह, सर्व सेवा ऑनलाईन करणे अशा विविध माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले. सन २०२४-२०२५ या वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. तसेच सर्व मालमत्तांच्या युपिक आयडीद्वारे पालिकेच्या सर्व सेवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुली एकात्मिक पद्धतीने वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालमत्ताकर आणि पाणीपट्टी दोन्हींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. तसेच यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रियेचा उपयोग झाला. यापुढेही जप्ती आणि लिलाव प्रक्रिया वर्षभर निरंतर स्वरूपात राबवण्यात येईल. नागरिकांनी त्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest