फोटो व्हायरलची धमकी, मैित्रणीवरच केला बलात्कार

मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्रानेच आपल्या २१ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीने कायम लैंगिक संबंध ठेवावेत अशी तो मागणी करत होता. संबंध ठेवले नाहीत तर कुटुंबीयांवर अ‍ॅट्राेसिटीची खोटी केस दाखल करून सगळ्यांना तुरुंगात पाठवेन अशी धमकीही तो देत होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 30 Jun 2023
  • 09:26 am
फोटो व्हायरलची धमकी, मैित्रणीवरच केला बलात्कार

फोटो व्हायरलची धमकी, मैित्रणीवरच केला बलात्कार

‘अ‍ॅट्रोसिटी’ दाखल करून कुटुंबीयांना तुरुंगात पाठवण्याची धमकी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्रानेच आपल्या २१ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीने कायम लैंगिक संबंध ठेवावेत अशी तो मागणी करत होता. संबंध ठेवले नाहीत तर कुटुंबीयांवर अ‍ॅट्राेसिटीची खोटी केस दाखल करून सगळ्यांना तुरुंगात पाठवेन अशी धमकीही तो देत होता. या प्रकरणी पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. करण आण्णा पगारे (रा. सामनगाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.  

चंदननगर पोलिसांनी ‘सीविक मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही पुणे शहरातील रहिवासी असून शिक्षणासाठी काही दिवसांपासून नाशिक शहरात राहात होती. आरोपी तिच्या  सोबतच नाशिकमध्ये शिकत होता. येथे दोघांची ओळख झाली होती. आरोपी पगारे याचा एक मित्र फोटोग्राफर आहे. त्याला मॉडेलिंगसाठी काही फोटो काढायचे होते. त्यासाठी एक मुलगा आणि मुलगी हवी होती. आरोपीने पीडितेला विचारल्यावर घरी सांगू नको असे सांगत ती त्यासाठी तयार झाली.

मॉडेलिंगच्या फोटोमध्ये अश्लीलता, बीभत्सता, अर्धनग्नता असे काहीच नव्हते. मुलीने साडी नेसून ते फोटो काढले होते. लग्नातील नवरा-नवरीसारखे दोघांनी जवळ उभे राहून काढलेले फोटो होते. मात्र तरुणीने ही बाब घरच्यांपासून लपवली होती. तिच्या घरचे कडक शिस्तीचे असल्याने ते रागावतील या भीतिपोटी ती आरोपीला हे फोटो बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेण्यास विनवणी करत होती. आरोपीने तिची दुखरी नस ओळखून तिला धमकवायला सुरू केले. शरीर सुखाची मागणी करत तिला आपल्या वासनेची शिकार केली.  

पीडितेने  आपल्याशी कायम संबंध ठेवावेत यासाठी आरोपी तिच्या कुटुंबीयांवर अ‍ॅट्राेसिटीची केस करण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या प्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून सुरू होता.

आरोपी करण पगारे हा मूळचा नाशिकचा राहणारा आहे. नंतर तो पुण्यात वडगाव शेरी येथील सोमनाथनगरमध्ये राहण्यास आला. येथे एका खासगी ठिकाणी तो काम करत आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो नातेवाईक, आई-वडील यांना तसेच समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितेला वडगाव शेरी येथील लॉजवर घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही आपल्याबरोबर शरीरसंबंध ठेवावेत अशी मागणी केली. त्यास नकार दिल्याने फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. चंदनगर पोलिसांनी करण पगारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे पुढील तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story