विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून तपासणी झाल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो.
राहुल शिंदे
rahul.shinde@civicmirror.in
TWEET@rahulsmirror
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेचा अनोखा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. प्रत्येक व्यक्तीची तपासणी केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो. याचवेळी विद्यापीठाचे मागील म्हणजेच खडकीकडील प्रवेशद्वार सताड खुले आहे. तिथून कुणीही थेट विद्यापीठाची आवारात प्रवेश करीत आहे. त्यांना कुणीही अडवत नसल्याचे चित्र आहे.
विद्यापीठाच्या सुमारे ४११ एकर आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून आवश्यक खबरदारी घेतल्याचे वरवर दिसते. कारण विद्यापीठाच्या केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच येणाऱ्या-जाणाऱ्यांची कडक तपासणी केली जाते. खडकीकडून येणाऱ्या प्रवेशद्वारावर आणि आयुका प्रवेशद्वारावर कोणतीही चौकशी न करता नागरिकांना विद्यापीठ आवारात सोडले जाते. त्यामुळे विनाकारण आवारात येणाऱ्यांसाठी विद्यापीठ पुढून बंद तर मागच्या बाजूने सताड खुले ठेवल्याचे दिसून येत आहे.
'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे शहरातीलच नाही तर देश-परदेशातील नागरिक विद्यापीठाला भेट देण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही विद्यापीठात कामानिमित्ताने यावे लागते. त्यातच पिंपरी चिंचवडसह औंध, नवी सांगवी, खडकी आदी भागातील नागरिक वाहतूक कोंडीतून जाण्याऐवजी विद्यापीठमार्गे जाण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने खडकी प्रवेशद्वार व आयुका प्रवेशद्वार येथे बायोमेट्रिक यंत्रणा सुरू केली. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे या प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणे शक्य होत नसल्याचे सुरक्षा यंत्रणाचे म्हणणे आहे.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याची आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याचबरोबर विद्यापीठातील चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेल्याचे प्रकारही वारंवार समोर येत आहेत. दोन विद्यार्थ्यांना धमकावण्यात आल्याचाही प्रकार नुकताच समोर आला होता. त्यामुळे विद्यापीठ परिसर सुरक्षित असणे गरजेचे आहे. विद्यापीठ आवारात अनोळखी व्यक्तींना प्रवेश देणे धोकादायक आहे. असे असूनही विद्यापीठातील कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय ओळखपत्र मागितल्यास ते दाखवण्यास नकार देतात. यावरून विद्यापीठ प्रशासनाने नियुक्त केलेले खासगी सुरक्षारक्षक आणि विद्यापीठातील कर्मचारी यांच्यात वाद होतात. त्यामुळे अनेक वेळा कर्मचारीच विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका करताना दिसतात.
पुणे विद्यापीठातील कर्मचारी खडकी प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वारानेच विद्यापीठात ये-जा करतात. इतर नागरिकांच्या वाहनांमुळे दररोज सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान विद्यापीठात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यात आली होती. तांत्रिक बिघाडामुळे सध्या ती बंद आहे. परंतु, लवकरच फेस रीडिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासन करीत आहे.
विद्यापीठाचा घनदाट झाडीचा परिसर प्रशासनाने बंदिस्त केला आहे. विद्यापीठातील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येत आहे.