Pune railways : न भिजता प्रवासी पोहोचणार रेल्वे स्थानकात, रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’त पुण्यातील चार स्थानके

केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्थानक योजनें’तर्गत भर पावसातही रेल्वे प्रवाशांची काळजी घेणार आहे. प्रवासी कार, रिक्षातून स्थानकात आल्यावर तो भिजू नये, याची दक्षता स्थानके विकसित करताना घेण्यात येणार आहे. प्रवेशद्वारासमोर वाहन आल्यानंतर प्रवासी रेल्वेत जाईपर्यंत त्याचा वावर सुलभ होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 12 May 2023
  • 03:10 am
न भिजता प्रवासी पोहोचणार रेल्वे स्थानकात

न भिजता प्रवासी पोहोचणार रेल्वे स्थानकात

कार, रिक्षामधून स्थानकात उतरल्यानंतर प्रवासी भिजणार नाही, याची ‘अमृत भारत स्थानक योजनें’तर्गत दक्षता

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्थानक योजनें’तर्गत भर पावसातही रेल्वे प्रवाशांची काळजी घेणार आहे. प्रवासी कार, रिक्षातून स्थानकात आल्यावर तो भिजू नये, याची दक्षता स्थानके विकसित करताना घेण्यात येणार आहे. प्रवेशद्वारासमोर वाहन आल्यानंतर प्रवासी रेल्वेत जाईपर्यंत त्याचा वावर सुलभ होणार आहे.

पुणे विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा अमृतकाळ येणार आहे. त्यात हडपसर, चिंचवड, देहूरोड आणि आकुर्डी या पुण्यातील महत्त्वाच्या उपनगरी स्थानकांचाही समावेश आहे. या स्थानकांचा चेहरामोहरा आकर्षक केला जाणार असून, प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. ‘‘रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा कायापालट करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना’ आणली आहे. या अंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागातील १५ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर, सांगली, हडपसर, चिंचवड, आकुर्डीसह इतर स्थानकांचा यामध्ये समावेश आहे,’’ अशी माहिती पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्थानक योजनें’तर्गत देशभरात १ हजार २७५ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुणे विभागातील १५ स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये हडपसर, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, बारामती, उरुळी,  केडगाव, लोणंद, वाठार, कराड, सांगली, हातकणंगले, सातारा आणि कोल्हापूर या १५ स्थानकांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे.

प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली आहे. स्थानकांचा होणारा विकास प्रवासी समोर ठेवून केला जाणार आहे. त्यात दूरदृष्टी तर असेलच, शिवाय सौंदर्याचाही विचार केला जाणार आहे. स्थानकाच्या बाह्य रचनेसोबतच अंतर्गत रचेनतही आमूलाग्र बदल केले जातील. भर पावसातही कार, रिक्षामधून उतरल्यानंतर प्रवासी भिजणार नाही, याची दक्षता स्थानक विकसित करताना घेतली जाणार आहे.

सध्याची प्रवासी संख्या आणि भविष्यातील वाढीची शक्यता लक्षात घेऊन या योजनेतील स्थानकांचा विकास केला जात आहे. मुख्य स्थानकालगतची स्थानके या योजनेअंतर्गत विकसित होत आहेत. त्यामुळे मुख्य स्टेशनजवळील महत्त्वाच्या स्थानकांतील प्रवासी सेवा अधिक चांगली होणार आहे. कोल्हापूर स्थानकात २०१९-२० मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या १७,७२५ होती.  हडपसरला १,३६८, चिंचवड २१,०४७, सातारा १,७३४, सांगली ५०००, कराड २,७१३, तळेगाव ३०,४२३ आणि हातकणंगले स्थानकावर दररोज ३,४५१ प्रवासी ये-जा करीत होते. त्यात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. याशिवाय संबंधित ठिकाणच्या मुख्य स्थानकाजवळील महत्त्वाचे उपनगर, पर्यटन, धार्मिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण अशा निकषांचा विचार स्थानकांच्या निवडीत केला गेला आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story