कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘पॅरामाऊंट’ डंम्पिग

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण करण्याकरिता एक भूखंड राखून ठेवला आहे. मात्र, या भूखंडाचा वापर आता पालिकेचा अतिक्रमण विभाग डंम्पिग ग्राऊंड म्हणून करत असल्याने या सोसायट्यांतील नागरिक हैराण झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nikhil Ghorpade
  • Sat, 8 Jul 2023
  • 10:13 am
कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘पॅरामाऊंट’ डंम्पिग

कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘पॅरामाऊंट’ डंम्पिग

दोन सोसायट्यांमधील नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या मैदानावर जप्त हातगाड्यांचा झाला डोंगर

निखील घोरपडे/अनन्या कट्टी

feedback@civicmirror.in

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण करण्याकरिता एक भूखंड राखून ठेवला आहे. मात्र, या भूखंडाचा वापर आता पालिकेचा अतिक्रमण विभाग डंम्पिग ग्राऊंड म्हणून करत असल्याने या सोसायट्यांतील नागरिक हैराण झाले आहेत.  

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पॅरामाऊंट इरॉस आणि पॅरामाऊंट गार्डन अशा दोन सहकारी गृहनिर्माण सोसायट्या असून त्यामध्ये अनुक्रमे २२० आणि ४० सदनिका आहेत. या दोन सोसायट्यांमध्ये असलेल्या मैदानातून अतिक्रमण विभागाने जप्त केलेले सामान हटवावे अशा मागणी नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, या मागण्यांकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे. या भागात नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा भूखंड पालिकेच्या प्राॅपर्टी विभागाच्या ताब्यात आहे. अतिक्रमण विभाग जप्त करत असलेल्या हातगाड्या या मैदानावर आणून टाकल्या जातात. या मैदानावर जप्त केलेल्या शेकडो हातगाड्या गंज खात पडल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेले मैदान आता उजाड अवस्थेत पडून आहे. आता येथे डास आणि माश्यांची पैदास जोमाने होत आहे. त्याशिवाय या मोकळ्या मैदानाला उंदरांनी आपले आश्रयस्थान बनवले आहे. हे पुरेसे नाही म्हणून की काय, या जागेत आता विषारी सापही आढळत आहेत. डास, उंदीर, माश्यांमुळे रोगराईची भीती तर, विषारी सापांमुळे जिवाला धोका अशा स्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय या मैदानातील चिखल वरील दोन्ही सोसायट्यांच्या आवारात पसरत असल्याने नागरिकांसमोरील समस्यांमध्ये वाढच होत आहे.    

पॅरामाऊंट गार्डनचे चेअरमन संतोष निंबाळकर म्हणतात की, या मैदानात जप्त हातगाड्यांचे गोडाऊन केल्याने नागरिकांना येथे सुखाने राहणे अवघड झाले आहे. मैदानातील चिखल रस्त्यावर आणि सोसायट्यांमध्ये पसरल्याने वाहन चालवणे जिवावरची कसरत ठरत आहे. त्याशिवाय मैदानातून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीमुळे येथे राहणे मुश्किल झाले आहे. हा विषय आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा उपस्थित केला आहे.  

याच सोसायटीत राहणारे डॉ. श्रीकांत निकुंभ म्हणतात की, मैदानात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या आणून टाकल्यामुळे उंदरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागात पसरलेली माती, चिखल आणि त्यातच रस्त्यावर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे वाहन चालवणे एक मोठे आव्हान ठरत आहे.  

कात्रजच्या प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम म्हणतात की, पालिका आयुक्तांच्या बैठकीत आम्ही हा विषय उपस्थित केला होता. त्यांनी येत्या दोन महिन्यांत मैदानातील सर्व हातगाड्या हालविण्यात येतील असे आश्वासन दिले होते. निविदा काढण्याच्या विषयामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला असल्याचे दिसते.  

अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी या हातगाड्या हलविण्यास असमर्थता दर्शवली. ते म्हणाले की, आम्ही जप्त केलेल्या हातगाड्या येथून हलवू शकत नाही. जप्त हातगाड्या ठेवण्यासाठी ही एकच जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. येथे पडलेला कचरा, राडारोडा हटवून काही जागा निर्माण करू शकतो, मात्र जप्त केलेल्या हातगाड्या हलविणे अशक्य आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story